रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवत प्रवाशाला लूटले

पुणे(प्रतिनिधी) – रिक्षा चालकाने साथीदाराच्या मदतीने एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत लूटले. ही घटना स्वारगेट ते पर्वती प्रवासा दरम्यान घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी संतोष सुभाष बंडगर(रा.संतोषनगर, कात्रज) हा 20 सप्टेंबर रोजी स्वारगेट एसटी स्टॅंडच्या आऊटगेटजवळ कात्रजला जाण्यासाठी रिक्षात बसला होता. यावेळी रिक्षात अगोदरच दोघे बसले होते. कात्रजला जात असताना रिक्षा चालकाने रिक्षा राजमाता हॉस्पिटलच्या बोळात घातली. यानंतर रिक्षात पाठिमागे बसलेल्या प्रवाशाने संतोषचा हात पकडून ठेवला. तर रिक्षा चालकाने पोटास चाकू लावून धमकावले. तिसऱ्या व्यक्तीने त्याच्या खिशातील रोख दोन हजार आणी 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्ती काढून घेतला. यानंतर त्याला रस्त्यात सोडून देण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय करत आहेत.

संतोष हा मुळचा सांगोला येथील असून तो पुण्यात एसी रिपेअरींगची कामे करतो. गणेशोत्सवात दरम्यान तो गावाला गेला होता. घटनेच्या दिवशी तो सांगोल्यावरुन पुण्यात आला, स्वारगेट येथे उतरताच आरोपींनी त्याला शेअर रिक्षा असून 30 रुपयांत कात्रजला नेतो असे सांगितले होते.

उत्सव हॉटेलच्या चौकात आल्यावर रिक्षा एका बोळात नेऊन त्याला लूटण्यात आले. घटनेमुळे तो भांबावला होता. तो त्याच्या मित्रांसोबत एका भाड्याच्या खोलीत रहातो. त्याने ही घटना काही दिवस मित्रांनाही सांगितली नव्हती. मित्रांनी मोबाईलबद्दल विचारणा केल्यावर त्याने घटना सांगितली. मित्राच्या सल्लयाने तक्रार दिल्यावर पोलिसांनी रिक्षाच्या हुडच्या रंगावरुन तीघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.