शिक्रापूर -आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिरूर तालुक्यातील भ्रष्टाचार प्रकरणी आक्रमक असलेले भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांची भेट नुकतीच झाली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असताना शिरूर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार तसेच शिरुर बसस्थानक बीओटीमधील भ्रष्टाचार याबाबत सखोल चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब भेगडे,
भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांसह आदी उपस्थित होते. सध्या शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या आजारपणामुळे संजय पाचंगे यांनी शिरुर तालुक्यात भारतीय जनता पार्टीची धुरा सांभाळली आहे.
पाचंगे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अशोक पवार यांच्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिरुर बसस्थानक बीओटी, कोविड – 19 साठीचे व्हेंटीलेटर, राव-लक्ष्मी फाउंडेशन अशा अनेक बाबतीत आक्रमक भूमिका घेत आमदार अशोक पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे.
आमदार अशोक पवार मात्र संजय पाचंगे यांच्याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. अशातच किरीट सोमय्या यांची भेट म्हणजे पवारांचा नंबर तर नाही ना, अशी चर्चा सध्या शिरूर तालुक्यात सुरू आहे.
संजय पाचंगे यांच्याशी संपर्क साधला असता गणपती विसर्जनानंतर यावर बोलू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर भारतीय जनता पार्टी काय डाव टाकणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.