पुणे – हवेच्या कमी दाबाची प्रणाली मध्य प्रदेशकडून गुजरातकडे सरकल्याने नाशिकसह राज्यात पावसाचा जोर ओसरला असून आगामी दोन दिवस केवळ हलक्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी वर्तवला आहे. सध्या मध्य प्रदेशात धुवाधार पाऊस होत आहे. गुजरातमध्येही आगामी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. सोमवारी राज्यात (Maharashtra Rain) ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाने (Department of Meteorology) केली आहे.
कोकण, घाटमाथा, आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, नाशिकच्या गंगापूर धरणातील विसर्ग सोमवारी संध्याकाळी 6 ला 569 क्युसेकने कमी करत 537 करण्यात आला. रविवारी संध्याकाळी 7 ला 1106 ने विसर्ग सुरू होता. हे पाणी मराठवाड्यातील नांदूर-मधमेश्वरला कडे जाते.
राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. बुधवारपासून विदर्भात देखील पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी आणखी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.