छत्रपती संभाजीनगर – मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणानंतर मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाच्या ( Kunbi Maratha community )नोंदी शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार कुणबी मराठा समाजाच्या नोंदी निजामकालीन असल्याची माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक 13 सप्टेंबर रोजी हैदराबादला ( Hyderabad) गेले होते. मात्र, या दौऱ्यातून खूप काही हाती लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचे एक पथक तयार करण्यात आले होते. ज्यात, 1967 पूर्वीच्या निजामकालीन “कुणबी’ अशा नोंदी असलेली माहिती घेण्यासाठी विभागीय अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्या नेतृत्वात हे पथक 13 सप्टेंबर रोजी हैदराबादला गेले होते.
या पथकाने हैदराबादमध्ये जुन्या रेकॉर्डची पाहणी केली. पथकाचा अंतिम अहवाल अद्याप आला नाही, परंतु खूप काही हाती लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पथकाच्या दौऱ्यात नेमकं काय झाले?
– पथकाने सर्व प्रकारचे रेकॉर्ड तपासले, मात्र ठोस काही सापडले नाही.
– 1931 पूर्वीची महत्त्वाची असणारी जनगणनेची घरयादी मिळाली नाही.
– जे दस्तऐवज सापडले ते आणले; काही रेकॉर्ड फारशीमध्ये आहे.
– अनेक दस्तऐवजांमध्ये कुणबी संदर्भ सापडला नाही.
– एकूण सनदची संख्या 1200 च्या आसपास आहे. त्यातील 1 हजार सनद राज्यातील असतील.
– नोंदीमध्ये मुस्लिमांना जास्त सनद दिल्याचे आढळले आहे.