चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचे काय? (भाग-२)

चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचे काय? (भाग-१)

सहा वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेला सामूहिक बलात्कार आणि क्रूर घटनांमुळे संपूर्ण देशभरात अशा प्रकारच्या घटनांबद्दल तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कायदे कठोर करून सुव्यवस्थेच्या पातळीवर बलात्कारासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जाणे अपेक्षित होतेच; परंतु केवळ तेवढेच अपेक्षित नव्हते. आपल्या समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल व्हावा तसेच महिलांचे आणि मुलींचे जीवन अधिक सुरक्षित व्हावे या दृष्टीने सामाजिक चेतना जागृत होईल, हेही अपेक्षित होते; परंतु सहा वर्षांनंतरसुद्धा महिला आणि मुली स्वतःला सुरक्षित मानू शकत नसतील आणि बलात्काराच्या घटनांमध्ये फारशी घट दिसत नसेल, तर जबाबदार कोण, हाच मुख्य प्रश्‍न आहे. बलात्काराच्या घटना टाळण्याच्या दृष्टीने कायदेशीर तरतुदी गुन्हेगारांच्या मनात भीती उत्पन्न करू शकतील; मात्र कार्यवाहीच्या पातळीवर ठोस व्यवस्था उभी करण्याची गरज आहे.

लहान मुलां-मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना सामान्यतः इतर गुन्ह्यांच्या यादीत समाविष्ट केल्या जातात आणि केवळ आकडेवारीच ठरतात. लहानग्या मुलींवरील बलात्कार हे अशा प्रकारच्या इतर घटनांप्रमाणेच मानले जातात; परंतु आपल्या समाजात कायद्याचे राज्य लागू करण्याच्या बाबतीत आपण किती मागे पडलो आहोत आणि सभ्य समाजाच्या संकल्पनेत आपण कुठे आहोत, हे अशा प्रकारच्या घटनांमधून लक्षात येते. वेळोवेळी होणाऱ्या सर्वेक्षणांमधून असे लक्षात आले आहे की, लहान मुलां-मुलींवर अत्याचार करणाऱ्या व्यक्‍ती बहुतांश वेळा त्यांच्या परिचयातील किंवा नात्यातीलच असतात. परंतु आपल्याला एखाद्याचे हेतू ओळखता येत नाहीत. बऱ्याच वेळा लहान मुलेमुली लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. कारण ते आपल्या शेजाऱ्यावर, परिचितावर, नातलगावर विश्‍वास ठेवतात. अशा प्रकारच्या जेवढ्या घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत, त्यात एकतर परिचित व्यक्‍ती आरोपी आहे किंवा शेजारी!

– विनिता शाह

Leave A Reply

Your email address will not be published.