प्रकरणाचा छडा लावण्याचे घारगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान
संगमनेर – आपल्या दिव्यांग चुलतीसोबत आडरानात लाकडं आणायला गेलेल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणात भीतीपोटी पीडितेने अत्याचाराची घटना दडवून ठेवल्याने त्यातून ती तब्बल सात महिन्यांची गरोदर राहिली.
तिच्या शरीरयष्टीवरुन तिच्या आईच्या ही बाब लक्षात आल्याने डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी नगर येथील स्नेहालय संस्थेत जावून घडला प्रकार कथन केला. याबाबत सोमवारी (ता.4) घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अत्याचारासह बालकांचे लैंगिक अत्याचार करणाऱ्या कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेची वार्ता पसरताच संपूर्ण पठारभाग हादरला असून आरोपीचा तात्काळ शोध घेवून कठोर कारवाईच्या मागणीने जोर धरला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षीच्या एप्रिल महिन्याच्या अंदाजे शेवटच्या आठवड्यात सदरची घटना घडली. तालुक्यातील एका गावातील पंधरा वर्षीय पीडितेची आठवीची परीक्षा संपल्याने ती घरीच थांबून शेतमजुरी करणाऱ्या आपल्या आईला मदत करीत असे. याच दरम्यान एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस दुपारी ती आपल्या ऐकू व बोलता न येणाऱ्या दिव्यांग चुलतीसह गावानजीकच्या खंडोबा डोंगरालगत असलेल्या गडदीच्या लवनात सरपण गोळा करण्यासाठी गेली होती.
यावेळी संधी शोधून रुमालाने तोंड झाकलेल्या एका अज्ञात इसमाने पीडितेची चुलती दुसरीकडे असल्याचे पाहून तिला फरपटत आड बाजूला नेले व दमबाजी करीत तिच्यावर अत्याचार केले व तेथून पसार झाला. या घटनेनंतर आई-वडील आपल्याला मारतील या भीतीपोटी त्या निष्पाप मुलीने सदरची घटना दडवून ठेवली. मात्र तिच्या या अज्ञानामुळे ती गरोदर राहिली. जसजसे दिवस गेले तसतसा तिच्या शरीरयष्टीतही बदल होत गेल्याने चार दिवसांपूर्वी तिच्या आईला संशय आला. त्यावरुन पीडितेच्या माता-पित्यांनी संगमनेरात येवून तपासणी केली असता ती सुमारे सात महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. आपली मुलगी गरोदर असल्याचे समजताच त्या दोघांनाही जबर धक्का बसला.
संबंधित डॉक्टराने त्यांना धिर देत नगर येथील स्नेहालय संस्थेत जाण्याचा सल्ला दिला व संबंधितांशी रुजवातही करुन दिला. स्नेहालयने नगर येथे सदर पीडितेची वैद्यकीय तपासणी करुन सोमवारी (ता.4) तिच्यासह स्नेहालयचे काळजीवाहक संतोष धर्माधिकारी व स्वाती बोरगे यांनी घारगाव पोलीस ठाणे गाठले. सदरच्या पीडितेने घडला प्रकार पोलीस निरीक्षक अंबादास भूसारे यांच्यासमोर कथन केला. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भा.द.वी.कलम 376(2)(आय) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याचे (पोस्को) कलम 4 व 8 नुसार गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक जीवन बोरसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.