हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र

देश-विदेशातील अनेक सर्वोच्च न्यायालयांच्या निकालांचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. विमा कंपन्यांद्वारे अपघाती विम्याचे संरक्षणातील तरतुदी स्पष्ट करणारा हा निकाल आहे. त्यामध्ये ह्रदयविकाराच्या झटक्‍याने गाडीवरून पडलेली व्यक्‍ती अपघाती विमा भरपाईस अपात्र ठरते हे स्पष्ट केले आहे.

श्रीमती अलका शुक्‍ला विरुद्ध लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या अपिलात 24 एप्रिल 2019 रोजी हा निकाल दिला आहे. सदर खटल्यात अपीलकर्त्या अलका शुक्‍ला यांच्या पतीने एल.आय.सी.च्या तीन पॉलिसी काढल्या होत्या. त्यामध्ये त्यातील तरतुदीनुसार सदर व्यक्‍ती अपघाती विम्यास पात्र असून सहज दिसणारा बाह्य आघात होऊन अपघात झाल्यास तो अपघाती नुकसानभरपाईस पात्र असेल असे स्पष्ट केले होते. दिनांक 3 मार्च 2012 रोजी सदर पती/विमाधारक मोटारसायकल चालवत असताना छातीत दुखू लागले व खांदेही दुखू लागल्याने तो गाडीवरून पडला. त्यानंतर त्याला एका दवाखान्यात नेले गेले तेथून प्राथमिक तपासणी करून दुसऱ्या डॉक्‍टरकडे पाठविणेत आले. तेथे डॉक्‍टरांनी त्याचा मृत्यू हा अचानक गाडीवरून पडल्याने झाला. मात्र, हृदयाच्या उजव्या बाजूला दुखत असल्याने व खांदे दुखू लागल्याने तो गाडीवरून पडला व त्याचे ह्रदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले.

सदर विमाधारकाच्या पत्नीने एल.आय.सी.कडे अपघाती विम्याचा क्‍लेम केला. मात्र, विमा कंपनीने सदर क्‍लेम अपघाती विम्यात बसत नसल्याचे कारण सांगून देण्यास नकार दिला. त्यावर विमाधारकाच्या पत्नीने ग्राहक संरक्षक कायदा 1986 नुसार जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली. त्यावर जिल्हा ग्राहक मंचाने सदर क्‍लेम मंजूर करून विमा कंपनीने 6 टक्‍के वार्षिक व्याजाने विमाधारकाला क्‍लेम देण्याचा आदेश दिला. त्यावर विमा कंपनीने राज्य ग्राहक न्यायालयात अपील केले. मात्र, राज्य ग्राहक न्यायालयाने सदर अपील फेटाळत विमाधारकाचा मृत्यू हा गाडीवरून पडल्याने झाला आहे. त्यामुळे त्याला अपघाती विमा द्यावा असा निकाल दिला. त्यावर विमा कंपनीने राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे या निकालाविरुद्ध अपील केले. राष्ट्रीय ग्राहक मंचाने सदर अपघात हा बाह्य आघाताने झाला नसून विमा पॉलिसीच्या अटीनुसार बाह्य आघाताने अथवा बाहेरून इजा अथवा हल्ला न करणारा असल्याने तो अपघाती विम्याच्या चाकोरीत बसत नाही असे स्पष्ट केले. विमा कंपनीचे अपील मंजूर केले. त्यावर विमाधारकाच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. त्यावर सविस्तर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सदर घटना अपघाती विम्यात बसत नसल्याचे स्पष्ट केले व त्या महिलेचे अपील नामंजूर केले.
अपीलकर्त्याच्या वतीने गाडीवरून पडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे अपघाती विमा या कक्षेत येईल असा युक्‍तिवाद करणेत आला. तर विमा कंपनीच्या वतीने असलेल्या तरतुदीनुसार बाहेरून शारीरिक इजा झाली अथवा अपघात झाला तरच तो अपघाती विमा ठरला जाईल, असा युक्‍तिवाद झाला.

सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाने कोलीन व्हॉक्‍स विम्याचा कायद्यामध्ये अपघातातील शारीरिक इजा ही फक्‍त बाहेरील नसते असे सांगितले आहे तर ब्लॅक लॉ च्या शब्दकोशानुसार बाहेरून हल्ला अथवा आघात म्हणजे शारीरिक हल्ला जो पायावर अथवा इतर अवयवावर होऊ शकतो. अपीलकर्त्याच्या वतीने कृष्णा विरुद्ध एलआयसी या खटल्याचा दाखला दिला गेला. मात्र, या खटल्यात गायीने धडक दिल्याने सायकलस्वार खाली पडला व त्यानंतर तीन दिवसांनी त्याचे हृदयविकाराने निधन झाले.त्यामुळे तो बाह्य आघात अपघात मानून त्याला अपघाती विम्याच्या कक्षेत मानले गेले, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याउलट सदर घटनेत मोटारसायकलवर हृदयविकाराचा झटका आल्याने बाहेरून कोणताही दर्शनी हल्ला शरीरावर झाला नाही त्यामुळे तो अपघाती विम्याच्या कक्षेत बसत नाही, असे स्पष्ट केले.

यासाठी विविध खटल्याचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीच्या तरतुदींचे विश्‍लेषण केले आहे. एकूणच नागरिकांनी फक्‍त अपघाती विमाच उतरविणे अयोग्य आहे तर सर्व प्रकारच्या निधनाचा देखील विमा उतरविणे गरजेचे आहे हाच महत्त्वपूर्ण संदेश या निकालातुन नागरिकाना मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.