अत्याचारग्रस्त बालिकेच्या उपचाराकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष

तपासी महिला अधिकाऱ्याला नोटीस बजावणार – बाबर

पिंपरी – अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिची हेळसांड करण्याचा प्रकार पिंपरी पोलिसांकडून घडल्याचे समोर आले आहे. घटनेच्या चोवीस तासानंतर पीडित मुलीला साधे उपचारासाठी देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नव्हते. लोकप्रतिनिधींनी जाब विचारल्यानंतरही रविवारी सुट्टी असल्याचे कारण देत उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला अटक करण्यात पुढाकार घेणाऱ्या पोलिसांनी मुलीच्या तपासणीकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नेहरूनगर, पिंपरी येथील एका पाच वर्षीय बालिकेवर 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करून आरोपीला अटकही करण्यात आली. मात्र अत्याचार झालेल्या बालिकेच्या उपचाराकडे पिंपरी पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. घटनेच्या 24 तासानंतरही बालिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नव्हते. याउलट महिला अधिकाऱ्याने पिडित मुलीच्या कुटूंबियांना दमदाटी करीत तुमच्या मुलीला काहीही झाले नाही. रविवारी ससून रुग्णालय बंद असल्याने सोमवारी पिडित मुलीची वैद्यकिय चाचणी करू, असे सांगून घरी पाठविले.

रविवारी सकाळी पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्याकडे तिचे पालक घेऊन आले. यामुळे डॉ. घोडेकर यांनी सहायक आयुक्‍त राम जाधव व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर बाबर यांना याबाबत विचारणा केली. त्यानंतर पोलीस वर्तुळात हालचाल सुरू झाली. रविवारी दुपारनंतर पिडित मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत बोलताना वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाबर म्हणाले, पीडित मुलीला उपचारासाठी रविवारी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तसेच मुलीच्या उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.