संगमनेर – भावाच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासणारी घटना संगमनेर शहरात समोर आली आहे. या घृणास्पद कृत्यातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून, या प्रकरणी मुलीच्या सख्ख्या चुलत भावाविरोधात अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरातील एका इमारतीमध्ये दोन भावांची कुटुंबे राहातात. त्यातील एकाचा हातगाडीवर खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय आहे. ही व्यक्ती पत्नी, मुलगा व मुलीसह राहतात. त्यांचा भाऊ पत्नी व दोन मुलांसह त्याच इमारतीत राहण्यास आहे. साधारण तीन महिन्यांपूर्वी घरातील मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून तिच्या चुलतभावाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीने त्यास प्रतिसाद न देता सदरची बाब घरी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या चुलत भावाने तसे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर सुमारे तीन महिन्यांपूर्वी सदर तरुणाने पुन्हा इमारतीत कुणी नसताना आपल्याच चुलत बहिणीवर अत्याचार केला. तसेच सदरचा प्रकार कोणास सांगीतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने कोठेही याची वाच्यता केली नाही. त्यानंतर या तरुणाने वेळोवेळी चुलत बहिणीवर अत्याचार केला.
गेल्या पंधरवड्यात सदर मुलीचे पोट दुखू लागल्याने तिला शहरातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते. तेथे संबंधित डॉक्टरांनी टाईफाईडचे निदान केल्याने तिच्यावर त्याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर घरी परतल्यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वी पुन्हा तिचे पोट दुखू लागल्याने तिच्या पालकांनी तिला पुन्हा त्याच रुग्णालयात नेले असता त्यांनी तिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
लोणीत पोहोचल्यावर तेथील डॉक्टरांनी सदरची तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याचा निर्वाळा दिल्याने त्या तरुणीचे पालक हादरले. डॉक्टरांच्या सल्ल्याने पीडितेच्या पालकांनी संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क साधला असता, पोलिसांनी थेट प्रवरा रुग्णालयात जावून पीडितेचा जबाब नोंदविला. तसेच तिच्या चुलत भावाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 6 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.