मुंबई – आदित्य ठाकरेंचा शिवसेनेशी संबंध कधीपासून आला ? त्यांचं शिवसेनेत योगदान काय ? आदित्य ठाकरेंनी कधी शिवसेनेसाठी एखादी शाखा स्थापन केली आहे का ? आंदोलन करत असताना आदित्य ठाकरेंच्या नावे एखादा गुन्हा किंवा पोलीस केस आहे का ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
माझ्यासारख्या व्यक्तीने बाळासाहेबांवर विश्वास ठेऊन ३६ वर्षे काम केलं. या महाराष्ट्रात आम्ही शिवसेना वाढवली. गाव तेथे शाखा आणि घर तिथं शिवसेना असे अनेक उपक्रम राबविले. आदित्यचं वय ३२-३३ वर्ष आणि आमचे शिवसेनेतील कतृत्व ३५-३६ वर्ष आमच्यासोबत बोलताना त्याने वयाचे भान ठेवले पाहिजे असा इशारा प्रतापराव जाधव यांनी दिला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
आदित्य ठाकरे शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून आमदार झालेले आहेत. म्हणून आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी जाधव यांनी केली. तसेच खोक्यांच्या टीकेला कोणताही आधार नाही. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर शंभर खोक्यांचा आरोप झाला त्यानंतर सचिन वझे आणि देशमुख जेलमध्ये आहेत. ते खोके सरकारच्या जेष्ठ नेत्यांपर्यंत जात होते का याच्या तपासाचीही गरज असल्याचे प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले.