नवी दिल्ली :-भारतीय कुस्तीगीर महासंघाची निवडणूक येत्या 6 जुलै रोजी होत आहे. मात्र, या निवडणुकीत ज्या 36 राज्य संघटना मतदान करणार आहेत, त्यातील जवळपास 75 टक्के राज्य संघटनांचे समर्थन ब्रिजभूषण शरण सिंह यांनाच आहे.
यातील 12 राज्य संघटना तर ब्रिजभूषण अध्यक्ष झाल्यावर अस्तित्वात आल्याने त्यांचेही समर्थन त्यांनाच जाणार म्हणजेच आंदोलक कुस्तीपटूंच्या पदरी काय पडणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेले ब्रिजभूषण यांची अध्यक्षपदाची तिसरी टर्म यंदा संपणार होती. त्यापूर्वीच कुस्तीपटूंच्या आरोपांची दखल घेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने महासंघाची संपूर्ण समितीच बरखास्त केली व त्याचवेळी ब्रिजभूषण यांचेही अध्यक्षपद गेले.
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितल्यानंतर ब्रिजभूषण तसेच यांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती निवडणूक लढवणार नाही. मात्र, असे असले तरीही त्यांचा मुलगा करण तसेच जावई आणि मेव्हणा विविध राज्यांच्या संघटनांवर कार्यरत असून त्यांच्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत. अशा स्थितीत ते निवडणुकीसाठी पात्र ठरत आहेत.
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची बैठक झाली होती. त्या बैठकीत कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर कोणताही सदस्य निवडणूक लढवत असेल तर अन्याय होतच राहणार, असा इशारा दिला होता. यामुळे ठाकूर यांनी ब्रिजभूषण यांना निवडणुकीत सहभागी न होण्याची सूचना केली होती.
ब्रिजभूषण यांच्या बाजूने 75 टक्के मतदान करण्याचा हक्क असलेल्या 36 मधील जवळपास 75 टक्के फेडरेशनचे समर्थन ब्रिजभूषण यांनाच आहे. यात हरियाणा कुस्ती परिषदेचा देखील समावेश आहे. याच राज्यातील सर्वात जास्त कुस्तीपटू आंदोलन करत आहेत हे विशेष.
अनेक राज्य कुस्ती फेडरेशन ही गेल्या 12 वर्षांत ब्रिजभूषण हे अध्यक्ष असताना तयार झाल्या आहेत. त्यामुळे ज्या कोणत्या उमेदवाराला ब्रिजभूषण यांचा पाठिंबा असेल त्याचाच विजय निश्चित मानला जात आहे.
एकूण 38 राज्य संघटना मतदान करतात. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा कीतीही प्रयत्न केला तरीही त्याला कितपत यश येईल सांगता येत नाही. जरी ब्रिजभूषण निवडणूक लढवत नसले तरी भारतीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष हा त्यांचाच वरदहस्त असलेलाच असणार हे उघड दिसत आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष निवडताना संलग्न राज्य कुस्ती फेडरशेनचे पदाधिकारी मतदान करतात. प्रत्येक राज्याच्या संघटनेचा अध्यक्ष आणि सचिवाला प्रत्येकी एक मत असते. दिल्लीतून दोन तर इतर केंद्रशासित प्रदेशातील कुस्ती फेडरेशनच्या एका प्रतिनिधीला मत देण्याचा अधिकार आहे. या मतांच्या आधारावरच अध्यक्ष निवडला जातो.