पुणे :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत ऋतुराज गायकवाड (64 धावा) व पवन शहा (57 धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुणेरी बाप्पा संघाने कोल्हापूर टस्कर्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवत शानदार सुरुवात केली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात महाराष्ट्र रणजीपटू अंकित बावणेच्या 57 चेंडूत 72 धावांच्या झंजावती खेळीच्या जोरावर सलामीच्या लढतीत कोल्हापूर टस्कर्स संघाला पुणेरी बाप्पा संघासमोर विजयासाठी 20 षटकांत 7 बाद 145 धावांचे आव्हान ठेवता आले.
स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रचंड संख्येने स्टेडियमवर जमलेल्या क्रिकेट शौकिनांनी आजचा दिवस गाजवला. पुण्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली.
केदार जाधव (22 चेंडूत 25 धावा, 3 चौकार, 1 षटकार) आणि अंकित बावणे यांनी कोल्हापूर संघाला वेगवान सलामी दिली. रोहन दामले याने केदार जाधवला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर मैदानात उतरलेला एमपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू नौशाद शेख केवळ 24 चेंडूत 20 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कोल्हापूरचा डाव 2 बाद 119 वरून 7 बाद 144 असा घसरला. पुणेरी बाप्पाकडून पियूष चावला (3-18) आणि सचिन भोसले (3-40) यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
याच्या उत्तरात पुणेरी बाप्पा संघाने 14.1 षटकात 2 बाद 145 धावा करून पूर्ण केले. यात ऋतुराज गायकवाडने 27 चेंडूत 5 चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 64 धावांची धडाकेबज खेळी केली. त्याला पवन शहाने 48 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 57 धावांची संयमी खेळी करून साथ दिली. या सलामीच्या जोडीने 61 चेंडूत 110 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला.
त्यांनतर ऋतुराज गायकवाड श्रेयस चव्हाणच्या गोलंदाजीवर अंकित बावणेकरवी झेलबाद झाला. यानंतर पवन शहाने सुरज शिंदे (नाबाद 17) च्या साथीत 32 धावांची भागीदारी करून संघाला (142 धावा) विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. त्यानंतर यश क्षीरसागरने नाबाद 2 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी ऋतुराज गायकवाड ठरला.
संक्षिप्त धावफलक…
कोल्हापूर टस्कर्स : 20 षटकात 7 बाद 144 धावा. (अंकित बावणे 72, केदार जाधव 25; पियुष साळवी 3-18, सचिन भोसले 3-40) पराभूत वि.पुणेरी बाप्पा : 14.1 षटकात 2 बाद 145 धावा (ऋतुराज गायकवाड 64, पवन शहा 57; तरनजीतसिंग धिलोन 1-13).