ओला, सुका कचरा एकत्रच!

कचरा विलगीकरणाचा बोजवारा ः ठेकेदार बदलले तरी समस्या कायम

सार्वजनिक ठिकाणीही कचरा एकत्र
ओला व सुका कचऱ्याचे स्वतंत्रपणे संकलन करण्यात महापालिका अपयशी ठरली असताना दुसरीकडे महापालिका जनजागृतीत देखील कमी पडत आहे. याचे उदाहरण रस्त्यांवर जागोजागी पहायला मिळत आहे. जनजागृतीसाठी महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी ओला व सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र कचरा कुंड्या ठेवणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेने तशी कोणतीही सोय नाही. परिणामी नागरिक याठिकाणीही सर्व प्रकारचा कचरा याठिकाणी टाकतात. ई-कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याचीही कोणतीही सोय नाही. त्यामुळे ओला व सुका कचऱ्यात ई-कचऱ्याचीही भर पडत आहे.

पिंपरी – शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने दोन ठेकेदार नेमले आहेत. नवीन कचरा वाहतुकीच्या गाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, नवीन ठेकेदार नेमून 25 दिवस उलटूनही शहरातील कचरा समस्या “जैसे थे’ आहे. विशेष म्हणजे ओला व सुका कचरा एकत्रितपणेच संकलित केला जात असल्याने महापालिकेने नेमका कोणता उद्देश साध्य केला, असा सवाल उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम आरोग्य विभागाने आखली होती. विविध माध्यमातून महापालिकेने जनजागृती देखील सुरु केली होती. पथनाट्यापासून ते घंटागाड्यांवर ध्वनी फितीपर्यंत स्वच्छ भारत अभियानाचा गवगवा करण्यात आला. 1 जुलैपासून नवीन दोन ठेकेदारांमार्फत शहरातील कचरा संकलित केला जात आहे. त्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नवीन वाहनांच्या उद्‌घाटनाचा “इव्हेंट’ करण्यात आला. या वाहनांमध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याची सुविधा आहे. परंतु, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दररोजच्या कचरा संकलन यंत्रणेतून पहायला मिळत आहे.

स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2016 नुसार कचऱ्याचे ओला, सुका व घरगुती घातक कचरा असे वर्गीकरण करून त्याची स्वतंत्र विल्हेवाट लावण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, महापलिकेकडून अद्यापही हा सर्व एकत्रितच संकलित केला जात आहे. महापालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांमध्येही ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे साठवण्याबाबत उदासिनता आहे. काही नागरिकांनी सुरुवातीचे काही दिवस कचरा वेगवेगळा दिला. मात्र, कचरा संकलन करणारे कर्मचारी तो वाहनांमध्ये एकत्रित करत असल्याचे पाहून नागरिकांनीही पहिले पाढे गिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपुर्ण शहरात कचरा संकलन जनजागृतीचे तीन तेरा झाले आहेत. परिणामी स्वच्छ भारत अभियानाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे.

 

महापालिकेच्या नवीन गाड्यांमध्ये कचरा गोळा करायला सुरुवात केली. तेव्हा आम्ही ओला व सुका कचरा वेगवेगळा साचवून तो महापालिकेच्या गाडीत टाकण्यासाठी देत होतो. परंतु, वाहनावरील कर्मचारी कचरा एकत्रितच टाकत आहेत. आम्ही कचरा वेगवेगळा गोळा करुनही त्याचा उपयोग होत नाही.
– सविता कोरे, गृहिणी, पिंपळे गुरव.

शहरातील कचरा संकलित करण्याचे नव्याने नियोजन केले आहे. दूरदृष्टीकोनातून हे काम सुरु आहे. सुरुवातीच्या काळात कचरा संकलनात अडचणी येतील. परंतु, आता शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे विलगीकरण होणार आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जाणार आहे. लवकरच ही समस्या मार्गी लागेल.

– एकनाथ पवार, पक्षनेते, महापालिका. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)