कोलकाता – भाजपच्या दुसऱ्या यादीत ज्यांना पश्चिम बंगाल मधील चौरंगी मतदार संघात उमेदवारी देण्यात आली होती, त्या शिखा मित्रा यांनी भाजपचे तिकीट नाकारले आहे. मी भाजपकडे तिकीटच मागितले नव्हते तरीही त्यांनी मला अनपेक्षितपणे हे तिकीट जाहीर केले आहे. तथापि आपण ही निवडणूक लढवण्यास उत्सुक नाही असे शिखा मित्रा यांनी म्हटले आहे.
शिखा मित्रा या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत, तसेच त्यांचे पुत्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस आहेत. त्या तृणमुल मधून भाजप मध्ये आलेले सुवेंदु अधिकारी यांच्याशी संधान साधून आहेत अशी मध्यंतरी चर्चा होती. अधिकारी यांनीच मित्रा यांना भाजपची उमेदवारी मिळवून दिली असे सांगण्यात येत आहे. तथापि माझ्या संमतीशिवाय भाजपने ही उमेदवारी जाहीर केली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. तथापि आपण भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे. मुळात आपण भाजप मध्ये प्रवेशच केलेला नाही, आणि करणारही नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.