कोटुलपुर, दि. 22 – भारतीय जनता पक्ष हा बाहेरच्या लोकांचा पक्ष आहे. ते येथे खोटी आश्वासने देऊन आणि दहशत माजवून तुमच्या घरी मतदान मागण्यासाठी येतील. त्यावेळी त्यांनी जर तुम्हाला धमावकण्याचा प्रयत्न केला तर घरातील भांडीकुंडी तयार ठेऊन त्याचा वापर करून भाजपच्या प्रचारकांना पळवून लावा असे आवाहन तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना केले.
त्या म्हणाल्या की भाजपने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासने देऊन तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी तुम्हाला मोफत रेशन देण्याचे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन कधीच ते पुर्ण करू शकणार नाहींत.भाजपचे लोक महिलांनाही त्यांच वेषभुषेवरून धमकावण्याचे काम करीत आहेत.
महिलांनी कोणती वेषभुषा करावी किंवा कोणती करू नये याचा आदेशही ते देऊ लागले आहेत. नरेंद्र मोदी हे, बाबासाहेब आंबेडकरांपेक्षाही मोठे नेते आहेत असेही ते तुम्हाला सांगतील असे त्या म्हणाल्या. त्यांनी गुजरातमधील एका स्टेडियमचे नाव बदलून त्याला मोदींचे नाव दिले. एकेदिवशी ते देशालाही मोदींचेच नाव देतील असा इशाराही त्यांनी दिला.