वाशिम : जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 25 मार्च रोजी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर या लॉकडाऊनमध्ये वाढ करत 3 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये सर्व नागिरक घरात असल्यामुळे प्रत्येकजण वेळ घालवण्यासाठी काही ना काही नवीन गोष्टी शिकत आहेत. तर कुणी घरातील कामं करत आहेत. या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील एका दाम्पत्याने चक्क 25 फूट खोल विहीर खोदली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक केले जात आहे.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील गजानन पकमोडे आणि पत्नी पुष्पा पकमोडे या दोघांनी आपल्या घराच्या अंगणात ही विहीर खोदली आहे. विशेष म्हणजे ही विहीर 25 फूट खोदल्यानंतर यामध्ये पाणी लागल्याने त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आहे.
मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील गजानन पकमोडे हे गवंडी काम करतात. मात्र राज्यात लॉकडाऊन असल्याने काम बंद असून जिल्हा प्रशासनाने बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळं घरच्या घरी काही तरी करायचं हा हेतू समोर ठेवून या दाम्पत्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठा विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.