न्यूयॉर्क: करोनाच्या साथीच्या आजाराने भरडले गेलेली अमेरिकन कुटुंबे खाद्यपदार्थांच्या बॅंकांकडे अधिकाधिक प्रमाणात वळत आहेत आणि जिथपर्यंत नजर जाते आहे, तिथपर्यंत फूड बॅंकेच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्याचे चित्र दिसत आहे. करोनाच्या साथीमुळे अमेरिकेत आतापर्यंत 22 दशलक्ष लोकांचा रोजगार रातोरात बुडाला आहे. भुकेलेल्या आणि घाबरलेल्या लोकांना खायला देणाऱ्या या सेवाभावी संस्थांवर आता हजारो अमेरिकन कुटुंबे अवलंबून आहेत. मात्र, ही मागणी सतत वाढत असल्याने एक दिवस या मागणीच्या त्सुनामीचा सामना आपण करू शकणार नाही, अशी भीती या सेवाभावी संस्थांनाही वाटायला लागली आहे.
पेनसिल्व्हेनियातील ग्रेटर पीटर्सबर्ग कम्युनिटी फूड बॅंकेच्या बाहेर मंगळवारी तब्बल 1 हजार कारची गर्दी झाली होती. टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे एप्रिल रोजी अन्न असुरक्षिततेचे वातावरण नव्याने उघड झाले होते. तेथे एकाच दिवसात फूड बॅंकेसमोर 10 हजार कार रांगेत उभ्या राहिल्या होत्या. खाद्यपदार्थांची मागणी मार्च महिन्यातील मागणीपेक्षा 40 टक्क्यांनी वाढली आहे. त्यासारख्या आठ केंद्रांवर जवळजवळ 227 टन अन्नपदार्थ भुकेल्या कुटुंबांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते, असे संघटनेचे उपाध्यक्ष ब्रायन गलिश यांनी सांगितले. शेकडो कुटुंबे या सुविधेचा प्रथमच उपयोग करून घेत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोकांना भोजन उपलब्ध करून देणे जवळपास अशक्य आहे, असे काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बहुतेक रेस्टॉरंट बंद झाली आहेत. फूड मॉलसारखी ठिकाणेही बंद आहेत. किरकोळ खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधील माल संपत आला आहे. तेथील फूड इंड्स्ट्रीला जोपर्यंत नव्याने अर्थसहाय्य, देणगी मिळत नाही, तोपर्यंत तेथे नवीन खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे शक्य नाही, अशी स्थिती आहे. अमेरिकेत कॉंग्रेसने आपत्कालिन निधी म्हणून 2.2 ट्रिलीयन डॉलरच्या पॅकेजला अलीकडेच मंजुरी दिली आहे.