शाब्बास पठ्ठ्या! २१व्या वर्षीच ग्रामपंचायतीवर ऋतु’राज’; सर्वात तरुण सदस्य होण्याचा मान

सोलापूर – राज्यभरातील ग्रामंपचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाला. १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर ही निवडणूक तरुणाईच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत नवखे चेहरे निवडून आले आहेत. अशाच एका सोलापूरच्या २१ वर्षीय तरुणाच्या नावाची चर्चा आहे.

सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील ऋतुराज पाटील असे त्याचे नाव असून सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य ठरला आहे. त्याच्या पॅनलचाही दणदणीत विजय मिळाला आहे. ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ऋतुराजने गाव विकासाचा तयार केलेला जाहीरनामा सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरला होता.

ऋतुराज पाटील याने ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ‘लोकनेते बाबुराव अण्णा पाटील ग्रामसमृद्धी पॅनल’ उभे केले होते. पॅनेलअंतर्गत ऋतुराजने ७ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील ५ जणांचा विजय मिळाला आहे. तर स्वतः ऋतुराजला १०३ मते मिळाली आहेत. आरक्षणाच्या सोडतीनंतर ऋतुराजला सरपंचपद भूषवण्याची संधी मिळाली, तर सोलापूरचा ऋतुराज राज्यातील सर्वाधिक तरुण वयाचा सरपंच ठरेल.

दरम्यान, ऋतुराज पाटील सध्या 21 वर्षाचा असून नुकतेच त्याचे बीएससीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता तो एलएलबी (LLB) ला प्रवेश घेणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.