वॉशिंग्टन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरवात करताना सर्वसमावेशकतेच्या धोरणाचा अवलंब करण्याची भूमिका मांडली आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेचे अमेरिकेने स्वागत केले आहे. भारताचे नवीन सरकार कोणताही भेदभाव न करता सर्वच गटातील लोकांचा विश्वास संपादन करण्याची भूमिका बजावेल तसेच अल्पसंख्याकांनाही आपलेसे करण्याचा प्रयत्न करील अशी भूमिका मोदींनी मांडली होती.
पंतप्रधान मोदी यांच्या या सर्वसमावेशकतेच्या धोरणाचे आम्ही स्वागत करतो. कोणीही मागे राहणार नाही, सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करून वाटचाल करण्याची त्यांची भूमिका योग्य आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकन प्रशासनाच्या प्रवक्त्याने मोदींबद्दल ही भूमिका व्यक्त केली आहे.
दरम्यान वॉशिंग्टन पोस्टने मोदींच्या निवडीबद्दल म्हटले आहे की त्यांना आता आश्वासन पुर्तता आणि लोकांच्या अपेक्षांची पुर्तता करण्याची अवघड कामगीरी पार पडावी लागणार आहे. देशाच्या अर्थकारणाला चालना देऊन त्यांना विकासाचे अनेक प्रश्न सोडावायचे आहेत असेही या दैनिकाने म्हटले आहे. देशाच्या अर्थकारणात मोठे बदल घडवण्याऐवजी अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भाजपचे नवीन सरकार भर देण्याची शक्यता आहे असे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे.