नितिन बानगुडे-पाटील यांच्या हस्ते
वाई – कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, शिवसेना उपनेते नितिन बानगुडे-पाटील यांच्या हस्ते रविवार, दि. 2 जून, रोजी बावधन येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती शिवसेना वाई तालुका उपप्रमुख विवेक भोसले यांनी दिली. यावेळी विवेक भोसले म्हणाले, शिवसेनेला कोणत्याही श्रेयवादाची किंवा खोट्या दिखाव्याची अपेक्षा नाही. शिवसेना- भाजपच्या माध्यमांतून शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासकामांची गंगा समाजाच्या शेवटच्या स्तरांपर्यंत पोहचवित आहोत. सध्याच्या शासन कालखंडात बावधन गावात व वाई तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमांतून विविध विकासकामे करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे परिवहनमंत्री नामदार दिवाकर रावते यांच्या परिवहन मंडळ फंडातून बावधन गावासाठी 16 लक्ष 50 हजार निधी नवीन एसटी स्टॅंड इमारत आम्ही मंजूर करून घेतली आहे. इमारत निधी मिळविण्यासाठी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका शारदाताई जाधव यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या इमारतीचे भूमिपूजनाचा कार्यक्रम, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य महेश शिंदे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कणूर रस्ता डांबरीकरण कामाचे व भैरवनाथ मंदिर परिसरात बसविलेल्या हायमास्ट लॅम्पचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम रविवारी, दि. 2 जून, 2019 रोजी सकाळी 9 वाजता बावधन येथे आयोजित केलेला आहे.