काश्‍मीर निर्णयाचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत

शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत पेढे व लाडू वाटप
सातारा –
केंद्र शासनाने जम्मू काश्‍मीरला लागू असलेले 370 आणि 35 अ हे कलम रद्द केल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणीच्यावतीने सोमवारी सायंकाळी 6 वाजता मोती चौकात शिवेंद्रराजेभोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडू व पेढ्यांचे वाटप करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी भर पावसात एकमेकांना लाडू भरवत जल्लोष व्यक्त केला.

जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जाचे कलम देणारे 370 व 35 अ हे कलम हटवण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली होती. या ऐतिहासिक निर्णयाचे पडसाद देशभर उमटले. सताऱ्यातही भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी केंद्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्याची जोरदार तयारी केली. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक धनंजय जांभळे व शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी पुढाकार घेऊन लाडू वाटपाचे नियोजन केले होते.

सायंकाळी 6 च्या दरम्यान मोती चौकात भर पावसात सर्वसामान्य नागरिकांना पेढे व लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी विठ्ठल बलसेटवर, अविनाश कदम, प्राची शहाणे, जयेंद्र चव्हाण, ऍड. प्रशांत खामकर, किशोर गोडबोले आदी उपस्थित होते. जीस कश्‍मीर मे शाहदत हो वो कश्‍मीर हमारा है, भारत माता की जय असा घोषणा देत निर्णयाचे स्वागत केले. आ. शिवेंद्रराजे यांनी नागरिकांना लाडू, पेढे देऊन आनंद व्यक्त केला.

चौकट- भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाल्यानंतर प्रथमच शिवेंद्रसिंहराजे भाजपच्या जाहीर कार्यक्रमात सामील झाले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान शिवेंद्रसिंहराजे मोती चौकात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे घातले. नगर विकास आघाडीचे भाजपवासी कार्यकते भर पावसातही उपस्थित होते. शिवेंद्र राजे यांना आधी पेढा भरवून भाजप सदस्यांनी लाडू वाटपाला सुरवात केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.