पुणे – गणरायाच्या आगमनासाठी महिनाभरापासून सराव करणाऱ्या ढोल पथकांचा सराव नदीपात्रात सुरू आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून मुठा नदीला आलेल्या पुरामुळे त्याला ब्रेक लागला आहे. अनेक ढोल पथकांच्या निवारा शेडची पुरामुळे पडझड झाली आहे. तर काही ठिकाणचे शेड वाहून गेले आहेत.
पुण्याचा गणेशोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल पथकांचे वादन आकर्षणाचा विषय ठरते. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी ढोल वाजविण्याचा सराव नागरी वस्तींमध्ये करण्यात मर्यादा येत असल्याने, बहुतांशी मंडळांना सरावासाठी नदीपात्राची हक्काची जागा मिळाली आहे. ढोल पथकांच्या सरावाकरिता नदीपात्रात पत्रा शेडचा निवारा उभारण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणातून मुठा नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. त्यामुळे या नदीला पूर आला आहे. परिणामी अनेक निवारा शेड या पुराच्या विळख्यात सापडली आहेत. पाण्याच्या प्रवाहासमोर ही निवारा शेड तग धरू न शकल्याने ती कोलमडली आहेत.