नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा भाजपमध्ये प्रवेश
लोणंद – लोणंद येथील राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आमदार मकरंद पाटील गटाचे विद्यमान नगराध्यक्ष सचिन शेळके यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत मुंबई येथे भाजपचे कमळ हाती घेतल्यामुळे लोणंदमधे राष्ट्रवादीला आठवडाभरातच आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
लोणंद नगरपंचायतचे नगराध्यक्ष सचिन शेळके यांनी राष्ट्रवादीतील गटबाजीला कंटाळून तसेच नगराध्यक्षपदाची आपली खुर्ची मजबूत करण्याबरोबरच राजकारणात आपले स्थान आणखी बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून आनंदराव शेळके पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील, ना. विनोद तावडे, माजी आमदार मदन भोसले, आनंदराव शेळके – पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
नुकताच आठवडाभरापूर्वी लोणंद आणि खंडाळा तालुक्याच्या अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली होती. या गोष्टीला आठवडा उलटला नाही तोच राष्ट्रवादीला लोणंदचे विद्यमान नगराध्यक्ष सचिन शेळके यांनी जोरदार झटका देत भाजपात प्रवेश केला. यामुळे लोणंदची राजकीय समीकरणे भाजपाच्या बाजूने दृढ होऊन लोणंदच्या नगरपंचायतीवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष अशा दोन्ही ठिकाणी भाजपाचाच नगरसेवक झाल्याने नगरपंचायतीवर भाजपची पकड घट्ट झाली आहे.
आगामी काळात भाजपाचे सरकार महाराष्ट्रात येणार असून स्वतःचा स्वार्थ न बघता लोणंदच्या विकासासाठी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी आमदार मदनदादा भोसले यांनी केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन मी आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
सचिन शेळके पाटील नगराध्यक्ष, लोणंद नगरपंचायत