थेऊर -मिशन बिगीन अगेनच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्र वगळता गावपातळीवरील आठवडे बाजार सुरू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी रात्री उशिरा आदेश जाहीर केले आहेत.
मात्र, यासाठी काटेकोरपणे अटी व शर्तीचे निर्बंध घालण्यात आले आहे. आठवडे बाजार सुरु झाल्याच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. ग्रामपातळीवरील आता मिशन बिगीन अगेनमुळे व्यवहार सुरू होणार आहेत.
करोना विषाणूंच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील यापूर्वी सुरू असलेले आठवडे बाजार सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवले होते. राज्याचे मुख्य सचिव यांनी राज्याच्या कार्यक्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली आहे.
(दि.30) पर्यंत मुदतवाढ आणि टप्पेनिहाय्य लॉकडाऊन समाप्त करणे व मिशन बिगीन अगेनबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता गावपातळीवरील आठवडे बाजार सुरू करणे क्रमप्राप्त असल्याने अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रशासनाने परवानगी दिली आहे.