बेंगळुरू-हजरत निजामुद्दीन मार्गावर साप्ताहिक किसान रेल्वे

19 सप्टेंबर ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत मिरज, पुणे स्थानकमार्गे धावणार

 

पुणे – भारतीय रेल्वेकडून शेतमाल वाहतुकीसाठी “किसान रेल्वे’ सोडण्यात येत आहे. वाढती मागणी लक्षात घेता बेंगळुरू-हजरत निजामुद्दीन-बेंगळुरू मार्गावर साप्ताहिक रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही मिरज आणि पुणे स्थानकमार्गे धावणार आहे.

भाज्या, फळे, धान्य आदी शेतमाल आणि नाशवंत पदार्थांची याद्वारे वाहतूक होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून पहिल्यांदा देवळाली ते मुजप्फरपूरपर्यंत किसान रेल्वे सोडली. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, किसान रेल्वे विविध मार्गांवर सोडण्याबाबतदेखील मागणी होत आहे. याच अनुषंगाने ही रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. 19 सप्टेंबर ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत ही गाडी मिरज-पुणेमार्गे धावणार आहे.

 

ही गाडी बेंगळुरूहून दर शनिवारी दुपारी 4.45 वाजता रवाना होणार असून, पुणे येथे रविवारी सायंकाळी 7.10 वाजता पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) रात्री 11.45 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार आहे.

हजरत निजामुद्दीन येथून दर मंगळवारी सकाळी 11 वाजता गाडी सुटणार असून, बुधवारी दुपारी 3.45 वाजता पुण्यात आणि गुरुवारी सायंकाळी 7.45 वाजता बेंगळुरू येथे पोहोचणार आहे. मैसुरू, हासन, बेळगाव, मिरज, पुणे, मनमाड, भुसावळ, भोपाळ, मथुरा आदी स्थानकांवर थांबा असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.