“सरकारकडे आकडेवारी नाही, त्यामुळे भरपाईचा प्रश्नच येत नाही” – सरकारचे संसदेत उत्तर

नवी दिल्ली – देशव्यापी लॉक डाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांची झालेली फरफट सर्वज्ञात आहे. सार्वजनिक वाहतुकीची साधने ठप्प झाल्याने अनेक श्रमिकांवर हा प्रवास पायी अथवा धोकादायक पद्धतीने करण्याची वेळ आली होती. यामध्ये अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते. मात्र सरकारदरबारी प्रवासादरम्यान मृत पावलेल्या या स्थलांतरित मजुरांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना संकटादरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले आहे. विरोधी पक्षांकडून यावेळी सरकारला, आपल्याकडे मूळ राज्यात परतलेल्या मजुरांची आकडे उपलब्ध आहे का?  असा प्रवास करताना अनेक मजुरांचे प्राण गेले आहेत याबाबत सरकारला माहिती आहे का? असल्यास मृत पावलेल्यांची आकडेवारी उपलब्ध आहे का? मृत पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात आली का? असे प्रश्न विचारले होते.

यावर कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लिखित उत्तर देत, ‘मृत पावलेल्या मजुरांच्या आकडेवारीची नोंद ठेवण्यात आली नसल्याने, याबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही.’ असा खुलासा करण्यात आला.

कामगार मंत्रालयातर्फे, प्रवासादरम्यान मृत पावलेल्या मजुरांची कोणतीही अधिकृत आकडेवारी जतन करण्यात आली नसून त्यामुळे भरपाई देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं सांगण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी याबाबत सरकारवर चांगलाच निशाणा साधला.

“कामगार मंत्रालयाचे, ‘स्थलांतरित मजुरांच्या प्रवासादरम्यान झालेल्या मृत्यूबाबत कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याने त्यांना भरपाई देता येणार नाही’ हे उत्तर खेदजनक आहे. मला वाटत की, एकत्र आपण सर्व जण आंधळे आहोत किंवा सरकारला वाटतं की आपण सर्वांचा फायदा उचलू शकतो.” असं दिग्विजय सिंह म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.