वीकेंड लॉकडाऊन…अंबानी दाम्पत्याचा वॉक अन् दंडात्मक कारवाई

महाबळेश्वरमधील गोल्फ मैदानावर वॉक केल्याने पालिकेने मैदान केले सील

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आणि उदयोगपती अनिल अंबानी हे पत्नी टिना अंबानींसहीत महाबळेश्वर येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मात्र लॉकडाउन असतानाही रविवारी सायंकाळी अंबानी दांपत्य आपल्या दोन्ही मुलांसहीत महाबळेश्वरमधील गोल्फ मैदानावर वॉकसाठी आले होते. त्यामुळेच पालिकेने या गोल्फ मैदानाची मालकी असणाऱ्या संस्थेला नोटीस बजावली आहे. तसेच दंडात्मक कारवाईचा इशारा दिल्यामुळे दि गोल्फ क्लबने आपल्या गोल्फ मैदानाला टाळं ठोकलं आहे.

मुकेश यांचे धाकटे बंधून अनिल सुद्धा अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर महाबळेश्वरला येतात. मात्र राज्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच कालावधीमध्ये अनिल अंबानी आपल्या कुटुंबीयांसहीत महाबळेश्वरला आले आहेत. ते डायमंड किंग नावाने प्रसिद्ध असणाऱ्या उद्योगपती अनुप मेहतांच्या बंगल्यावर वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसांपासून येथेच असलेले अनिल अंबानी सकाळ, संध्याकाळ आवर्जून वॉकसाठी बाहेर पडतात.

महाबळेश्वरमध्येही अनिल अंबानी रोज गोल्फ मैदानावर वॉकला जात होते असे समजते. गावातील काही मंडळीही येथे सायंकाळी चालायला येतात. मात्र हळूहळू येथे अनिल अंबानी चालायला येतात ही बातमी पसरल्याने सायंकाळी मैदानात येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. यासंदर्भातील खबर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही मिळाली. यासंदर्भातील माहितीची खात्री करुन घेतल्यानंतर त्यांनी मैदानाची मालकी असणाऱ्या संस्थेला थेट नोटीस पाठवली.

सध्या लॉकडाउन नियामांतर्गत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना तुमच्या मालकीच्या गोल्फ मैदानावर शहरातील अनेक नागरिक सायंकाळी चालण्यासाठी येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ही नोटीस प्राप्त होताच तातडीने गोल्फ मैदान सायंकाळी चालायला येणाऱ्यांसाठी बंद करण्यात यावे. या ठिकाणी इव्हिनिंग वॉकसाठी नागरीकांना प्रवेश दिला जाऊ नये. अन्यथा या जागेची मालकी असणाऱ्यांविरोधातआपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसेच भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आलाय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.