महाबळेश्वर (प्रतिनिधी) – महाबळेश्वर तालुक्यातील मेटतळे येथे आढळून आलेल्या दुर्मिळ शिंगाळा घुबटाच्या पिल्लाची देखभाल केल्यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. यावेळी पिल्लाचा आवाज ऐकून त्याची आई तिथे आल्याने मायलेक पुन्हा एकमेकांना भेटले असून यासाठी सह्याद्री प्रोटेक्टर्स व वनविभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने पिल्लाचा जीवही वाचला आहे.
याबाबत घडले असे की, महाबळेश्वरचा परिसर जंगलांनी वेढला असून बरेच वन्यजीव पक्षी या भागात आढळतात. तसेच घुबडांच्या प्रजाती देखील या भागात आढळतात. महाबळेश्वर पासून 6 कि. मी. अंतरावरील मेटतळे या गावातील मंदिराच्या बाजूला राहणार्या अंकुश शिंदे यांच्या घराच्या बाजूला असणार्या कंपाउंडच्या भिंती खाली जमिनीवर दुर्मिळ शिंगाळा जातीच्या घुबडाचे पिल्लू बसलेले आढळले.
स्थानिकांनी ही बाब सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या जवानांना कळवली. दुपारची वेळ असल्या कारणाने या पिल्लास तिथेच सोडणे योग्य नसल्याने सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या सागर जाधव, संदेश भिसे, हर्ष साळुंखे, साहिल सुतार यांनी ही बाब वनरक्षक विलास वाघमारे यांना कळवली व घटना स्थळी जावून घुबडाचे पिल्लू ताब्यात घेतले.
या पिल्लाची वाढ झाली असून शिंगळा जातीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर हे पिल्लू वन विभागाच्या हिरडा वन विश्रामगृहात आणण्यात आले. 2 ते 3 दिवस देखरेखीमध्ये ठेवल्यानंतर त्याची प्रकृती ठीक झाली.
ते अन्न खावू लागले व त्याला उडता येवू लागल्याने वनक्षेत्रपाल गणेश महांगडे यांच्या मार्गदर्शना खाली वनरक्षक विलास वाघमारे, वनमजूर सागर भिलारे तसेच सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे, हर्ष साळुंखे, साहिल सुतार यांनी ज्या भागात पिल्लू सापडले होते. त्या भागात दि. 2 मे रोजी रात्री पिल्लू येथील उंच झाडावर ठेवले. यावेळी पिल्लाने विशिष्ठ प्रकारचा आवाज काढण्यास सुरुवात केली. दोन तास वाट पहिल्या नंतर पिल्लाची हाक ऐकून पिल्लाची आई पिल्लाशेजारी आल्याने व आई पिल्लाचा मिलाप घडून आला.