बुवांची बाजी

आपलं मन आणि शरीर ह्यांचा मिलाफ होणं जरुरीचं असतं. आपण शरीरावर, शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो; परंतु मनावर नियंत्रण मिळवणं, मन आपल्या ताब्यात ठेवणं खूप अवघड असतं. मनावर जो विजय मिळवू शकतो, तो सर्वच पातळींवर यशस्वी ठरत असतो. ह्या मनासाठी दोन बाबींची गरज असते, एक मोटिव्हेशन आणि दुसरी मोठी वेसण. मनाला उत्स्फूर्त, उपकृत करण्यासाठी जशी मोटिव्हेशनची जरुरी असते, तशीच मनाला आवरण्यासाठी मोठी वेसण देखील वापरावी लागत असते, ह्याची सतत जाणीव असणं आवश्‍यक असतं. “मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ महामार्गांवर अनेक ठिकाणी आपण अशा पाट्या बघत, वाचत असतो. अशा पाट्या वाचून देखील आपण वाचू शकत नाहीत, हीच खेदाची बाब आहे. पाट्या वाचून देखील, त्यातून आपण काही बोध घेतच नाही, म्हणूनच अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुसतंच वाचाल तर वाचाल, असं म्हणून चालत नाही; तर त्याचा गांभीर्यानं विचार आणि तशी त्वरित कृती करणं आवश्‍यक असतं.
आपल्यासाठी आपलं सुप्तावस्थेत असणारं अंतर्मन अधिक महत्त्वाचं असतं. आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहारांचा थेट परिणाम आपल्या अंतर्मनावर होत असतो. विचार, वर्तन आणि व्यवहार सकारात्मक पातळीवर अंतर्मनावर कोरले गेले, तर यशप्राप्ती सहज साध्य आणि शक्‍य होत असते. ह्या उलट नकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहार या सर्वांमुळे अंतर्मनाला दु:ख, नैराश्‍य आणि एकूणच आपल्या वाट्याला अपयश येतं. आपल्या दृष्टिकोनावर आपले अनुभव संचित होत असतात. अनुभव सुख-दु:खाचे म्हणजेच संमिश्र स्वरूपाचे असतात.

भावना, विश्‍वास आणि श्रद्धा आपल्या आचाराचा संबंध ग्लॅमरशी तर विचारांचा संबंध थेट ग्रामरशी असल्याचं प्रथम समजून घेणं अधिक जरुरीचं असतं. आपल्या विचारांतून आपल्या संकृतीचं आणि प्रकृतीचं दर्शन घडून येत असतं. विचारांच्या अगोदर केलेल्या आचारातून काहीजणांमध्ये विकृतीचं दर्शन घडतं, ते कोणालाच मान्य नसतं. एकूणच अशातून नकारात्मक वातावरण निर्माण होत राहतं, ते अधिक तापदायक, घातक ठरू शकतं, ह्याची जाणीव होणं आवश्‍यक असतं. प्रगल्भ विचार आणि दिलदार मन लाभलेली कोणतीही व्यक्ती आकृती उरत नसते, तर ती स्वतःच एक कलाकृती बनून राहते. अशी व्यक्ती आपल्या संस्कृतीचं स्मरण ठेवून, स्वतःच्या प्रकृतीला अनुसरून, समाजातील विकृतीकरण थांबवण्यात सक्रिय असते. यातूनच कलाकृती साकारली जात असते, पाहायला मिळते. अशा व्यक्ती आपलं जगण्यापलीकडचं जीवन सामाजिक बांधिलकीचं भान राखून नवनवीन कलाकृती साकारत असतात. परंतु काहीवेळा, मनाचा निर्धार करून श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा परिघ निश्‍चित करायचा ठरवला की, आपसूकच काही प्रश्न पडतात. प्रश्न पडले की उत्तर शोधणे अपरिहार्य होऊन बसते आणि उत्तर सापडले की उत्तराबरहुकूम वागण्याची जबाबदारी येऊन पडते.

बुवांचं अस्तित्व आणि सत्य
आपलं स्वत:चं मानसिक समाधान करून घेण्यासाठी मन अगोदर श्रद्धाळू बनत असतं आणि कालांतरानं अंधश्रद्धाळू होत जातं. श्रद्धेच्या अतिरेकातून जन्माला आलेल्या अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागातच असतात असं नाही, तर शहरी समाजजीवनावर देखील त्यांचा पगडा असतो, केवळ त्यांचे प्रकार थोडे निराळे असतात इतकंच. शहरी जीवनाची पाळेमुळे शेवटी ग्रामीण मातीलाच जाऊन मिळालेली असतात. ग्रामीण भाग ते शहर ह्या झालेल्या प्रवासात त्या श्रद्धा-अंधश्रद्धांचेही कळत-नकळत स्थलांतर झालेलं असतं. स्थलांतरामुळे परिसर बदलतो, आसपासची माणसं बदलतात, जीवनशैली बदलते, विचारांची दिशाही थोडीबहुत बदलते; परंतु अंधश्रद्धाळू मन मात्र काही केल्या बदलायला तयार होत नसतं. त्याचंच प्रतिबिंब घरात, दारात, मंदिरात, रस्त्यात अर्थात सर्वत्रच उमटत असल्याचा प्रत्यय आपल्याला रोजच येत असतो. जीवनात सुख मिळावं म्हणून रूढी-परंपरांनी जखडलेलं कुटुंब अवतारी पुरुषाला, स्वयंघोषित महाराजाला वश होत असतं. त्याचप्रमाणे अल्ट्रा मॉडर्न राहणीमान असलेलं टेक्‍नोसॅव्ही उच्चशिक्षित कुटुंब देखील बाबा-बुवा आणि तथाकथित महाराजांच्या पायांवर लोटांगण घालू लागतं.

एखादा प्रश्न देखील न विचारता अनेकजण, बाबा-बुवा सांगतील त्याप्रमाणे त्याग, दान, पुण्य, त्या तथाकथित बुवा-महराजांची पंचतारांकित सेवा करण्यास तयार होत असतात. यात श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा कशाला म्हणायची? याचं हेतुपुरस्सर भान ठेवलं जात नाही अथवा त्याची जाणीवच होत नाही, हाच कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक माणसाचा स्वभावधर्म भिन्न असतो, हे सत्य एरवी सहज मान्य केलं जातं; प्रत्येकाच्या मन:शांतीची जागा आणि साधन एकच नसतं, मात्र हे कुणालाही सहसा मान्य होत नाही. मन:शांती मिळवून देत असलेल्या आपापल्या स्वतंत्र जागांचा शोध न घेता लोक हजारो-लाखोंच्या संख्येनं एकाच बाबा-बुवा, तथाकथित, स्वयंघोषित महाराजांच्या नादाला लागतात. आपण नेमकं काय करतोय? ह्याची त्यांना साधी जाणीवही कशी होत नाही?

अंधश्रद्धेचं भूत
अनेकदा दु:ख अधिक आणि सुख मात्र अगदी थोडं आपल्या वाट्याला आलं असल्याचं म्हटलं जातं. खरं तर, जसा चष्मा लावावा तसंच दिसतं. प्रत्येक विषयाकडे आपण कसं पाहतो, त्याअनुषंगानं आपलं वैचारिक मंथन सुरू राहत असतं. सर्वप्रथम बाह्यमन त्याचा विचार करायला लागतं आणि त्याच वेळी आपल्या सुप्त अंतर्मनावर प्रत्येक विषय प्रतिबिंबित होत राहतो. मग क्रिया आणि प्रतिक्रियांचा खेळ सुरु होतो. अंतर्मनावर प्रतिबिंबित झालेले प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहारांमध्ये परिवर्तन करत राहतात. अनेकदा मनात येणारे विचार आपल्या गत अनुभवांशी निगडीत असतात, तर ते काहीवेळा नजीकच्या भविष्यात काय, कसं आणि कधी घडावं? याबद्दलचे असतात. आयुष्याच्या अवघड शाळेत आपण कोणत्या वर्गात आहोत, परीक्षा कोणती आहे हे ठाऊक असतंच असं नाही; कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. परंतु जे काही घडत आहे, ते केवळ आपल्याच बाबतीत असल्याचं समजलं जात असल्यानं नकारात्मक विचार मनात थैमान घालू लागतात. काहीवेळा तर ह्या नकारात्मकतेची जागा अंधश्रद्धा घेऊ लागते. कालांतरानं विचारात बदल घडवून आणण्याच्या ऐवजी अंधश्रद्धेचं भूत आपल्याला अधिकच नकारात्मकतेकडे घेऊन जाऊ लागतं.

स्वयंघोषित बुवा-महाराजांना महत्त्व किती?
हल्ली अनेकजणांना सोशल मीडियानं ग्रासलं आहे. फेसबुक, युट्यूब, व्हॉटस्‌ ऍप इत्यादीच्या माध्यमातून अनकेदा बघायला मिळणाऱ्या काही पोस्ट, छायाचित्रं, व्हिडिओ, मजकूर खरोखरच सत्याची बाजू घेणारा असतो का? त्यात समाविष्ट असलेली नकारात्मकता मात्र थेट आपल्या अंतर्मनावर विपरीत परिणाम करायला लागते. कदाचित, एखाद्या व्यक्तीचं यश देखील आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतं. अलीकडच्या काळात तरुण मुलं-मुली नैराश्‍याची शिकार होताना दिसत आहेत. नकारात्मक विचारांचं पर्यवसान रागात, उद्वेगात आणि कालांतरानं गुन्हेगारीत होण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात खूपच वाढल्याचं दिसून येत आहे. ही अतिशय खेदाची आणि चिंतेची बाब आहे. मनावरचा ब्रेक; उत्तम ब्रेक, असे फलक आपल्याला महामार्गांवर लावलेले बघायला मिळत असतात. आपल्या जीवनाची गाडी सुरळीत पुढे जात राहावी ह्यासाठी आपल्या मनावरचा ताबा स्वतःला मिळवता येणं आव्हानात्मक असलं, तरीही गरजेचं असतं. मनाचा अभ्यासपूर्वक विचार न करता स्वयंघोषित बुवा-महाराजांना महत्त्व देण्यातच अनेकदा धन्यता मानली जात असते. अर्थात परंपरागत सिद्धता प्राप्त असलेल्या महराजांचा कृपाशीर्वाद मिळणं निश्‍चितच भाग्यदायी ठरू शकतं.
बुवाबाजी
भौतिक प्रगतीपाठोपाठ आकारास आलेल्या जीवनशैलीने आडमार्गाला पर्याय ठेवलेला नसतो. काळाचे चक्र उलटं फिरणं शक्‍य नसतं. हव्यास- मग तो ज्ञानाचा असो, संपत्तीचा असो वा सुखसोयींच्या साधनांचा असो- तो कमी करण्याचं आत्मिक बळ अलीकडच्या काळात दिसत नाही. आत्मिक बळ हरवत चाललेला समाज शरीरानं थकत जातो, तसाच तो मनानंही खचत असतो. मनानं खचलेल्या समाजाला बुद्धिप्रामाण्य झेपत नाही. अशा वेळी हेतुपुरस्सर बुद्धी अडगळीत टाकून देणे, हा पर्याय सोयीचा ठरतो. बुद्धी अडगळीत पडली की श्रद्धेच्या आधारावरच आयुष्य पेलण्याचा प्रयत्न केला जातो. याच प्रयत्नात श्रद्धेची सीमारेषा ओलांडून अंधश्रद्धेच्या काळ्या दुनियेत प्रवेश होतो. या दुनियेत मनासारखं सुखही नसतं, समृद्धीही नसते, मन:शांतीही नसते. त्यामध्ये गडद काळोखाची जीवघेणी दलदल आणि दलदलीत दबा धरून बसलेलं मन असतं, ह्याची जाणीव होणं आवश्‍यक असते.

बाबा, महाराजांच्या नादी लागणाऱ्यांच्या कृतीचा अन्वयार्थ लावणं म्हणजेच त्यांच्यातील उणिवांचे पाढे वाचण्यासारखंच असतं. त्यामुळेच ह्या तथाकथित आध्यात्मिक गुरू, महागुरूंचं चांगलंच फावतं. त्यातूनच हे तथाकथित महागुरू कोट्यवधी रुपयांचं साम्राज्य निर्माण करतात. आपल्याला योग्य वाटतील ती तत्त्वे अंगीकारण्याचं स्वातंत्र्य लोकशाही व्यवस्थेनं आध्यात्मिक गुरूंच्या शिष्यांना दिलेलं असल्याप्रमाणे प्रत्येक शिष्यांचे विचार, वर्तन आणि व्यवहार/व्यभिचार सुरू असल्याचं अनेकांच्या बाबतीत स्पष्ट झालं असल्याचं आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र ही तत्त्वे पाळताना कायदा मोडला जाऊ नये. लोकांनी श्रद्धा, परंपरांचा अंगीकार करताना कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याचं भान राखलं जावं. भोंदू बाबा, बुवा यांच्या नादी कोणीही लागू नये याकरिता शास्त्रीय दृष्टिकोन, चौकस दृष्टी, बुद्धिप्रामाण्यवाद या गोष्टी लोकांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातूनच उत्तम प्रकारे रुजवणे आवश्‍यक आहे. आपल्याला चौकस बुद्धी लाभल्याने आध्यात्मिकतेच्या नावाखाली सुरू असलेली भोंदूगिरी सहजपणे ओळखता येते. अशा वेळी बुद्धिप्रामाण्यवादी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून नियोजनबद्ध रीतीनं काम करणं जरुरीचं आहे. बुद्धी अडगळीत पडली की श्रद्धेच्या आधारावरच आयुष्य पेलण्याचा प्रयत्न केला जातो. याच प्रयत्नात श्रद्धेची सीमारेषा ओलांडून अंधश्रद्धेच्या काळ्या दुनियेत प्रवेश होतो. या दुनियेत मनासारखे सुखही नसते, समृद्धीही नसते आणि मन:शांतीही नसते.

– प्रा. शैलेश कुलकर्णी

Leave A Reply

Your email address will not be published.