मनस्थिती बदला परीस्थिती बदलेल

सकाळी नेहमीपेक्षा उशिरा जाग आली. उशिरा उठल्यामुळे चांगलीच धांदल उडाली. प्रत्येक कामाचा वेग वाढला. झटपट अंघोळ झाली. कपडे परिधान केले. बायकोने नाश्‍ता आणून दिला. नाश्‍ता गडबडीत खात असताना चहाचा कप कपड्यावर सांडला. आता मात्र चिडचिड झाली. चहा नीट न ठेवल्याचा राग पुन्हा बायकोवर निघाला. वादविवाद झाले. ऑफिसला निघालो रस्त्यात ट्राफिकमुळे पुन्हा चिडचिड झाली. ऑफिसला उशिरा पोहचल्याने बॉसची बोलणी खावी लागली. बॉसचा राग माझ्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निघाला. एकूणच त्यानंतर संपूर्ण दिवस खराब गेला. यामुळे मी, बायको, बॉस, सहकारी आणि इतरांना यातून मानसिक त्रास तर झालाच. आता या साऱ्या ताणताणावयुक्त दिवसासाठी जबाबदार कोण?

झोप…? नाही ती तर नैसर्गिक आहे.
मी…? शक्‍यच नाही मी तर लगबगीने कामे करीत होतो.
बायको…? छे, तिने तर बिचारीने सर्व वेळेवर हातात आणून दिले.
बॉस…? नियमानुसार ते तर त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत.
मग कोण ?
खूप विचारांती उत्तर मिळाले आणि ते म्हणजे… परिस्थिती… उत्तेजक परिस्थिती. होत्याचे नव्हते करणारी अचानक उद्भवलेली परिस्थिती.

आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागते. यातील काही परिस्थिती आपली मनस्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरत असते. आणि एकदा का मनस्थिती बिघडली की मग ताणताणाव, चिडचिड, त्रागा आणि नकारात्मक भावना वाढीस लागत असते. यातून अपेक्षित असे काहीही साध्य होत नाही मात्र मानसिक त्रास हमखास आपल्या वाट्याला येत असत असतो आणि या ताणतणावयुक्त मानसिकतेतून आपण आपला वेळ, ऊर्जा आणि पैसे गमावत असतो. आयुष्यातील असे अनेक क्षण असतात जे आपल्याला सुखद अनुभव देऊन जात असतात. आपण अशा क्षणांची आतुरतेने वाटही पाहत असतो. मात्र परिस्थितीला शरण जाऊन घेतलेले निर्णय अनेकदा आपले नुकसानच करीत असतात. आणि यातून आपण आपल्या सुंदर आयुष्यातील बहुमोल क्षण गमावून बसतो.

अशावेळी आपण बरेचदा परिस्थिती बदलण्याचाच विचार मनात आणतो. त्यादृष्टीने प्रयत्नांना सुयोग्य कृतींची जोड देऊन परिस्थितीला बदलण्याचा मानस ठेवतो. परंतु अनेकदा प्राप्त परिस्थितीला बदलण्याचा आपला प्रयत्न सपशेल फेल ठरतो. आणि मग त्या परिस्थितीबाबत पूर्वग्रहदूषित मानसिकता निर्माण करून भविष्यात अशा परिस्थितीपुढे हार पत्करतो आणि ही हार, हे अपयश आपल्याला यशापासून परावृत्त करीत असतात. अशावेळी गरज असते ती परिस्थिती बदलण्याऐवजी आपली मनस्थिती बदलण्याची.

एक आश्रम होता. त्या आश्रमात गुरू आणि त्यांचे काही अनुयायी राहत असत. गुरू अनुयायांना नेहमी विविध प्रसंगातून जीवनाबाबत धडे देत असत.
एकदा अनुयायांनी आपल्या गुरूंना संगितले, “गुरुवर्य आपल्या एका शिष्याने गुरुदक्षिणा म्हणून आपल्या आश्रमाला एक गाय भेट दिली आहे’.
गुरुजींना आनंद वाटला. गुरुजी म्हणाले, “अरे वा अतिउत्तम! आता आश्रमातील सर्व शिष्यांना आजपासून रोज दूध प्यायला मिळणार’. गाय आश्रमात आल्याने गुरुंसह सर्वांनाच खूप आनंद झाला. आता सर्वांना त्या गायीचे सकस दूध रोज प्यायला मिळू लागले. एक महिना निघून गेला. महिनाभरानंतर तो शिष्य परत आला आणि काही कारणाने गुरूंच्या अनुपस्थितीत आपली गाय परत घेऊन गेला.

आता अनुयायांना दुःख झाले. ही गोष्ट आपल्या गुरूंना कशी सांगायची याची चिंता त्यांना वाटू लागली. मला न विचारता तुम्ही त्याला गाय कशी काय दिली ,असे गुरू विचारणार या भीतीने त्यांचा थरकाप उडाला. गुरू परगावाहून आश्रमात परतले. भीत भीत अनुयायी त्यांच्याजवळ गेले. खाली मान घालून गुरूंना म्हणाले, गुरुवर्य तो शिष्य आपली गाय घेऊन गेला.

गुरू म्हणाले, “ती त्याचीच गाय होती आपली कुठे होती’. आता मात्र सर्व अनुयायी “आ’ वासून गुरूंकडे पाहू लागले. त्यातील एक अनुयायी गुरूंना म्हणाला, पण आता आपल्याला रोज दूध मिळणार नाही ना? बाकीच्या अनुयायांनी देखील होकारार्थी मान डोलावली. त्यावर लगेच गुरू म्हणाले, “दूध मिळणार नाही हे ठीक आहे. पण बरं झालं आता शेण काढण्याचा पण त्रास वाचणार ना’. त्यांच्या या उत्तराने अनुयायी गुरूंकडे पाहतच राहिले. गुरू म्हणाले, “बाळांनो परिस्थिती बदलो न बदलो मनस्थिती बदला… मग बघा दुःखाची भावना सुखात बदलेल’.

आपल्या आयुष्यातही आपल्याला अनेक प्रसंग आणि बिकट परिस्थितींना सामोरे जावे लागते. अशावेळी परिस्थितीचा विचार करण्यापेक्षा मनस्थिती बदलण्याचा विचार करायला हवा. आपल्या मनाचे सुप्त सामर्थ्य प्रचंड आहे. फक्त परिस्थितीनुसार ते आपल्याला अजमावता आले पाहिजे.

सागर ननावरे

Leave A Reply

Your email address will not be published.