Weather in the country : देशात हिवाळा सुरु होऊन २ महिने होत आहेत मात्र अजूनही देशात दरवर्षीप्रमाणे थंडी पडली नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशातील काही भागात पुढील चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पडेल. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. आज केरळ, तामिळनाडू आणि आज लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 12 डिसेंबरपर्यंत सिक्कीम, बंगालमध्ये भागात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाकडून देशात पुढील 24 तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम तसेच झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) चेन्नईमध्ये जनजीवन अद्याप विस्कळीत आहे.
तर दुसरीकडे पर्वतीय भागांत बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतात गारठा वाढला आहे. राजधानी दिल्लीत तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये वेगाने वारे वाहत असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच 9 डिसेंबरला बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड, तेलंगणामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाची शक्यता असून अनेक भागात तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. तर आज पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात दाट धुके दिसून येईल. याशिवाय पुढील तीन दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय बिहारमध्ये 10 डिसेंबरपर्यंत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये 9 ते 11 डिसेंबरपर्यंत दाट धुके कायम राहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.