नवी दिल्ली | आम्ही लोकसभेच्या दिल्लीतील सगळ्या म्हणजे सातही जागा जिंकू असा दावा आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
विशेष म्हणजे या सात जागांपैकी एक असलेल्या पूर्व दिल्लीतून उमेदवारीसाठी आपचे सध्या तुरूंगात असलेले नेते मनिष सिसोदिया यांचे नाव सगळ्यांत आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून समजते.
सिसोदिया आपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि दिल्लीचे शिक्षण मंत्री होते. मात्र एका कथित घोटाळ्यात अटक झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सिसोदिया सध्या भलेही तुरूंगात असतील मात्र देशाची घटना आणि कायद्यानुसार जोपर्यंत एखाद्या प्रकरणात कोणत्या न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून शिक्षा दिली नसेल तर ती व्यक्ती विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेची निवडणूक लढवू शकतो.
आमदार म्हणून सिसोदिया यांचे काम चांगले असून ते पूर्व दिल्लीतीलच आपल्या पटपडगंज मतदारसंघात चांगले लोकप्रिय आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार जर कोणत्या कारणामुळे सिसोदिया निवडणूक लढवू शकले नाहीत तर त्यांच्या पत्नीला लोकसभेसाठी याच पूर्व दिल्लीतून रिंगणात उतरवण्याची तयारी आपने केली आहे.