नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडे एक अजब मागणी केली आहे. भारतीय चलनांमध्ये येणाऱ्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती आणि लक्ष्मीचाही फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. त्यामुळे सुख-समृद्धी येईल आणि संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल. नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.
या वरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे याच मुद्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’नोटांवर फोटोच छापायचे असतील तर ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. अर्थक्रांतीचा सखोल अभ्यास केला, त्यांचा फोटो हवा, अशी प्रतिक्रिया अंधारे यांनी दिली आहे.