पिंपरी – शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने नव्याने फ्लेक्स लावण्यास परवानगी नाकारली आहे; मात्र, तरीदेखील “आम्ही पळून जाऊन लग्न केले, अशा आशयाचे मोठ्या आकाराच्या पेपरवर लिहत, ती पोस्टर्स शहराच्या विविध भागांत चिटकविली आहेत. या आशयाबद्दल नागरिकांचे मनोरंजन होत असले, तरीदेखील शहराच्या विद्रुपीकरणात भरच पडत असल्याचे चित्र आहे.
गेल्या एक-दोन वर्षांत शहरातील मुख्य चौकातील दर्शनी भागातील मोठ-मोठ्या फ्लेक्सवर ढसढशीतपणे केवळ एखाद्या वाक्याचा मजकूर लिहत नागरिकांचे लक्ष वेधण्याचे प्रकार घडले आहेत. युवकाने शहरभर लावलेल्या “सॉरी’ आशयाच्या भल्यामोठ्या फ्लेक्समुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी झाली होती. त्यानंतर महिलांना अडचणीची ठरु शकणारी एका कापड दुकानाची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. हा प्रकार एवढ्यावरच तांबला नाही, तर एका रेस्टॉरंटनेदेखील भल्या मोठ्या फ्लेक्सवर सहावीत शहरात आल्याच्या आशयाने नागरिकांचे लक्ष वेधले होते.
नागरिकांचे लक्ष वेधण्याचे हे प्रकार नव्याने उदयास येत असले, तरीदेखील त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे या महाभागांना काही देणे-घेणे नसते. तसेच बेकायदेशीरपणे होणाऱ्या या कृत्यांबद्दल प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याचे अशा प्रवृत्तींचे फावत असल्याचे आम्ही पळून जाऊन लग्न केल्याचे कागदावरील आशय हेच अधोरेखीत करत आहे.