मुंबई: येत्या विधानसभेला आम्ही एकत्रच असून त्यासंदर्भात “आमचं ठरलाय” या बाबतची सविस्तर बैठक येत्या ३-४ दिवसात होणार असून त्यानंतर ३१ तारखेला आमची विधानसभेबाबतची भूमिका स्पष्ट करू. असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच एमआयएमचे असुदुद्दीन ओवैसी यांच्या घरी मी जेवणासाठी जाणार असल्याच्या विधानालाही त्यांनी पुष्टी दिली आहे.
दरम्यान विधानसभे संदर्भात दुसरं कुणी काही बोलत असेल तर ते त्यांचं महत्व वाढवण्यासाठी बोलत असून, निवडणुकीसंदर्भात मी आणि ओवेसीच निर्णय घेणार आहोत. तसेच यासंदर्भात आमचं अगोदरच ठरलाय असंही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्षअसल्याने, त्यांनी आमच्यासोबत यावं ही आमचीही इच्छा आहे. पण, काँग्रेसची भूमिका पाहूनच आम्ही निर्णय घेऊ, असेही आंबेडकर म्हटले.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागांसंदर्भात आंबेडकर यांच्या पुण्यातील घरी बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम पक्षाची बैठक पार पडली. परंतु या बैठकीत जागा वाटपाचा कोणत्याही ठोस निर्णय झाला नव्हता. दरम्यान, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी 100 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. परंतु जागावाटपासंदर्भात मी आणि असुदुद्दीन ओवैसी हेच अंतिम निर्णय घेतील,असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे