महापालिकेकडे बेड नसल्याने अनेक बाधित “वेटिंग’वर
हॉस्टेल, रुमवर राहणाऱ्या करोना बाधितांना मिळताहेत सूचना
अलगीकरणासाठी सुविधा नसल्याने रुग्णांनी जायचे तरी कोठे?
पुणे – करोनाच्या नव्या बाधितांपैकी जवळपास 60 टक्के रुग्ण हे 20 ते 40 वयोगटातील असून त्यातही बहुतांश जण शिक्षण-नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या अलगीकरणात अडचणी येत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अलगीकरणासाठी जागा नसल्याचे सांगत या बाधितांना थेट गावी जाण्याच्या सूचना केल्या जात असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत.
शहरात गेल्या महिनाभरापासून करोनाचे बाधित अचानक वाढल्याने आरोग्य यंत्रणाही चक्रावली असून, या रुग्णांमध्ये करोनाचा जुनाच स्ट्रेन आहे, तर लक्षणांमध्ये काहीसा बदल झालेला आहे. यामध्ये सोसायट्यांमध्ये वास्तव्यास असलेल्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. यात अनेक जण नोकरी तसेच शिक्षणानिमित्त शहरात हॉस्टेल अथवा तीन ते चार जणांमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन वास्तव्यास आहेत. अशा बाधितांना करोनाची सौम्य लक्षणे असल्याने महापालिकेने त्यांना त्यांच्या हॉस्टेल अथवा रुमवर नाही, तर पुण्यात नातेवाईक असल्यास त्यांच्याकडे विलगीकरणात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
मात्र, बाधित असल्याने तसेच हॉस्टेल अथवा रुममध्ये जागा तसेच जेवणासह इतर सोयी नसल्याने या बाधितांना तिथे जाणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेनेच आपल्याला अलगीकरणात ठेवावे, अशी मागणी हे रुग्ण करत आहेत. पण, पालिकेचे कोविड केअर सेंटर बंद असल्याने तसेच रुग्णालयात गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी जागा ठेवणे आवश्यक असल्याने या रुग्णांना बेड मिळवण्यासाठी तासन्तास ताटकळत ठेवले जात आहे, अथवा गावी जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
असे घडताहेत प्रकार
बार्शीच्या एका युवकाला करोना झाल्याचे रॅपिड ऍन्टिजेन टेस्टदरम्यान समोर आले. पु.ल देशपांडे उद्यान करोना चाचणी केंद्रात दोन दिवसांपूर्वी त्याची चाचणी करण्यात आली. या युवकाने आपण हॉस्टेलमध्ये राहत असून आता करोनामुळे हॉस्टेलवर जाता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर येथील डॉक्टरांनी त्याला बार्शीला जाण्याचा सल्ला दिला.
तेथे अलगीकरणाची सुविधा असल्याचे हमीपत्र देण्याचे सांगितले. मात्र, घरी जाण्यासाठी साधन नसल्याने तसेच बसने प्रवास कसा करणार असे या युवकाने निर्दशनास आणून दिल्यानंतर “तुम्ही तुमची सोय करा आमच्याकडे बेड नाही’ असे सांगत जवळपास 3 तास या युवकाला थांबवण्यात आले.
त्यानंतर या युवकाने “प्रभात’च्या प्रतिनिधीशी संपर्क साधला, तर “प्रभात’च्या प्रतिनिधीने ही बाब सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालिकेच्या औंध येथील खेडेकर दवाखान्यात या रुग्णासाठी डॉ. वावरे यांनी बेडची सुविधा उपलब्ध करून दिली.