शिरगाव, – मावळ तालुक्यात अनेक वर्ष बिनविरोध निवडणुकांची परंपरा पुसाणे गावाने जपली आहे. या गावाच्या विकासाकरिता निधी देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार सुनील शेळके व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या अमोल वाजे तसेच उपसरपंच भरत धनाजी वाजे, ग्रामपंचायत सदस्य अनिल वाजे, तुषार आवंढे, उज्ज्वला वाजे, सुजाता वाजे, सीमा वाजे, सारिका मेट यांचा ग्रामस्थांच्यावतीने आमदार सुनील शेळके व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले की, पुसाणे गावाने पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासकामासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करुन दोन्ही पक्षातील नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया साधली आहे.
यावेळी माजी सभापती एकनाथ टिळे, गुलाबराव म्हाळस्कर, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, भाजप तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, युवा मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, गोधामचे अध्यक्ष नितीन घोटकुले, दत्तात्रय माळी, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले, गोपाळ मळेकर, विजय कांबळे, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले उपस्थित होते. शांताराम वाजे, अनिल वाजे यांनी मनोगत व्यक्त केले.
निधीच्या माध्यमातून गावात विकासकामे
पुसाणेच्या विकासासाठी मागील काळात भरघोस निधी दिला असून, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याने पंचवीस लाखाचा निधी देत आहे, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. तर माजी मंत्री भेगडे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना सत्तेचा वाटा असल्याने व्यासपीठावर महिला सदस्य दिसत आहेत. गावच्या विकासकामांसाठी नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी दिला जाईल. त्या माध्यामातून गावात विकासकामे करण्यात येतील.