-->

पुण्याचा पाणीवापर जैसे थे; पण काटकसरीने : पालकमंत्री पवार

कोणालाही पाणी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री पवार

पुणे – शहरी व ग्रामीण भागातील जनतेला न्याय द्यायचा आहे. पाण्याचा गैरवापर थांबवा. जलसंपदा विभाग व महापालिका यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, अशा सूचना देत उन्हाळ्यात कोणालाही पाणी कमी पडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक विधानभवन येथे सोमवारी झाली. यावेळी लोकप्रतिनिधींसह महापालिका व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी शुक्रवारी
ही बैठक झाली होती. मात्र, त्यावेळी निर्णय झाला नव्हता. त्यावेळी खडकवासला प्रकल्पाच्या कालवा समितीच्या बैठकीत जलसंपदा विभाग व महापालिका आमनेसामने उभे राहिले होते. अशातच शहरी भागाला पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, तर ग्रामीण भागातूनही शेतीला जादा पाणी मिळावे, अशी मागणी होऊ लागली.

त्यामुळे पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी वाटपाबाबत ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. यावर मध्यस्थी करत पवार यांनी हा तोडगा काढला आहे. ‘पुणे महापालिका हद्दीत पाणी गळतीचे प्रमाण 30 ते 35 टक्के आहे. त्यामुळे प्रामुख्याने गळती रोखण्यासाठी उपाययोजना करा. उन्हाळ्यात पाण्याची दोन आर्वतने मिळाली पाहिजेत,’ अशी मागणी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी केली.

पवार यांनी दिलेल्या सूचना
पाण्याचा किती वापर होतो हे तपासण्यासाठी
महापालिकेने ऑडिट करावे.
पाण्याची चोरी रोखण्यासाठी पथके नेमा.
आवश्‍यकता भासल्यास पोलिसांची मदत घ्या.
पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करा.

जलसंपदा विभागाचे म्हणणे…
पुणे महापालिकेचा पाण्याचा वापर वाढत आहे. मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी महापालिकेकडून उचलले जात आहे. तसेच लोकसंख्येची खरी आकडेवारी महापालिकेकडून मिळत नाही, असा आरोप जलसंपदा विभागाने यावेळी केला. नियमानुसार 155 प्रति लिटर प्रतिमाणसी इतके पाणी महापालिकेने घेतले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र 270 प्रति लिटर प्रति माणसी याप्रमाणे पाणी उचलत आहे.

महापालिकेचे म्हणणे…
महापालिकेकडून 63 लाख लोकसंख्येला 155 प्रति लिटर प्रति माणसी याप्रमाणे पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली. महापालिकेमध्ये नव्याने 23 गावे समाविष्ट होणार आहे. त्यामुळे ही बाब विचारात घेता पाण्याचा कोटा मंजूर करण्यात यावा. तसेच सद्यस्थितीत भामा आसखेड धरणातून निम्मेच पाणी मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.