वाघोली, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दाभाडे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रामभाऊ दाभाडे ग्रामपंचायतच्या सरपंचपदापासून ते जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापर्यंत प्रभावीपणे कामकाज करणारे वाघोली परिसरातील राजकीय नेते आहेत. दाभाडे यांचा ग्रामपंचायतीच्या पॅनलमध्ये पॅनलप्रमुख म्हणून देखील वचक अनेक वर्षे राहिला आहे. वाघेश्वर देवस्थानचे ते अनेक वर्षांपासून उपाध्यक्ष म्हणून कामकाज देखील पाहत आहे.
वाघोली आणि पंचक्रोशीतील राजकीय जडणघडणीत सक्रिय असणारे दाभाडे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तानाजी सावंत यांच्याशी सलोख्याचे व जवळचे संबंध असून सध्या दाभाडे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा वाघोलीत मोठ्या प्रमाणात आहे.
रामभाऊ दाभाडे यांच्या घरी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. आता उपमुख्यमंत्री असताना देखील दाभाडे यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्याने दाभाडे भाजपच्या वाटेवर असल्याचे चित्र जाणवू लागले होते.