आश्चर्यकारक…! बोरअवेलमधूनच पाण्याच्या उसळ्या

वाघळवाडी (तुषार धुमाळ) – परतीच्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्र यंदा धुूऊन काढला आहे. ओला दुष्काळ सदृष्य परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. हे असतांना बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथील शेतकरी भास्कर देशमुख (गाव – चौधरवाडी ता: बारामती जिल्हा पुणे) यांच्या शेतातील बोअरवेलमधून मागील काही दिवसांपासून चार ते पाच फूट उंचीपर्यंत पाण्याचे उंच फवारे उडत आहेत.

पाच वर्षांपूर्वी १५० फुटावर देशमुख यांनी बोअर घेतलं होतं, या बोअरवेलच्या पाण्यावरती ते चार ते पाच महिने शेती करतात. उन्हाळ्यामध्ये ही बोअरवेल पूर्णपणे कोरडी ठणठणीत असते, पण मागील काही दिवसांमध्ये होत असलेल्या परतीच्या पावसामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. येथील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अतिरिक्त पाऊस जेव्हा होतो, तेव्हा भूगर्भातील खडकाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपलेली असते. त्यावेळी पाणी जमिनीवर येते. जिथे जिथे पोकळी मिळेल तिथून हे पाणी भुपूष्ठावर येते. या अशाच प्रकारची परिस्थिती चौधरवाडी गावातील देशमुख यांच्या शेतात पहावायस मिळत आहे.

पाण्याचा दबाव इतका आहे, की बोअरवेलच्या तोंडावरील केसिंगच्या पाइपला तडे गेले आहेत. पाणी सर्व बंधने तोडून चार ते पाच फूट उंच बोअरवेलच्या बाहेर उसळ्या मारत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देशमुख यांच्या शेतातील या बोअरवेलचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.