पुणे – शहरातील आज पावसाची नोंद केवळ 22 मिमी झालेली असतानाही रस्ते जलमय झाले तर भुयारी मार्ग पाण्याने भरले. स्मशानभूमी, दुकाने, सोसायट्यांमध्ये पाणी साचले. रस्त्याकडेला असलेल्या गणेश मंडळांभोवती पाणी साचल्यामुळे कार्यकर्त्यांची धांदल उडाली.
कोथरूड, वारजे, कर्वेनगर, कात्रज, बावधन, औंध, पाषाण, येरवडा, विश्रांतवाडी, धायरी, आंबेगाव, कोरेगाव पार्क, हडपसर, मगरपट्टा, एरंडवणा यासह अन्य भागांत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढताच रस्त्यांसह काही चौकांमध्ये पाणी साचले. यावेळी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली.
कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी येथील भुयारीमार्ग पाण्याने भरून गेला. यावेळी पायरीवरून वाहत असलेले पाणी पाहून साक्षात “भुशी डॅम’ कोथरूडमध्ये अवतरला, अशा टीकात्मक प्रतिक्रिया पुणेकरांकडून व्यक्त केली गेली. भुयारी मार्गासह स्मशानभूमीमध्येही पाणी शिरले होते. दुकाने, स्मशानभूमी, सोसायटीचे पार्किंग आणि काही गोडाऊनमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या.
शुक्रवारी (दि.22) शहरात मोठ्या प्रमाणात अनेक भागात पाणी साचल्यानंतर तसेच शनिवारीही पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर महापालिकेकडून 15 क्षेत्रीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली होती. महापालिकेस तक्रार प्राप्त होताच. तातडीने पाण्याचा निचरा करण्यासाठी पथके पाठविण्यात येत होती. त्यामुळे शहरात अनेक भागात लगेच पाणी निचरा करून देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांनी दिली.
कर्वेनगर स्मशानभूमी पाण्यात
महापालिकेच्या पावसाळी वाहिन्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्याने तसेच ड्रेनेजही भरल्याने अनेक भागात पाणी चेंबरमधून रस्त्यावर आले. तर कर्वेनगर येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली होती. ही माहिती मिळताच वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून तातडीने कर्मचारी नियुक्त करून पाण्याला वाट करून देत स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली.
क्षेत्रीय कार्यालयावर पथके सज्ज
शुक्रवारी (दि.22) शहरात मोठ्या प्रमाणात अनेक भागात पाणी साचल्यानंतर तसेच शनिवारीही पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर महापालिकेकडून 15 क्षेत्रीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली होती. महापालिकेस तक्रार प्राप्त होताच. तातडीने पाण्याचा निचरा करण्यासाठी पथके पाठविण्यात येत होती. त्यामुळे शहरात अनेक भागात लगेच पाणी निचरा करून देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांनी दिली.
पु. ल. देशपांडे उद्यानासमोर तळे
सिंहगड रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी धायरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पु .ल. देशपांडे उद्यानासमोरील महावितरण कार्यालयासमोर, विठ्ठलवाडी चौक, हिंगणे चौक तसेच पाटील हॉस्पिटल समोर पाण्याची तळी साचली होती. परिणामी, सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होऊन दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. याबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर तातडीने पाण्याचा निचरा केला जात होता.