मला चांगले आठवते, पूर्वी कोणी सढळपणे-भरपूर खर्च केला, की म्हणत असत, त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला. मग तो केलेला खर्च लग्नासारख्या एखाद्या कार्यासाठी असेल, वा कोणाला मदत करण्यासाठी असेल, वा विशेष करून एखाद्याच्या आजारपणात औषधोपचारासाठी असेल. पण खूप पैसा खर्च करणे याला पाण्यासारखा खर्च करणे म्हणत असत. अमूक अमूकच्या आजारपणात पाण्यासारख पैसा खर्च झाला किंवा खर्च केला असे मी अनेक वेळा ऐकलेले आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करणे म्हणजे पैशाची उधळपट्टी नव्हे.
योग्य कारणासाठी पैसा खर्च करणे आणि तो खर्च करत असताना मागेपुढे न पाहणे. यात पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाचा हेतू असायचा. पाणी अनमोल आहे, पाणी म्हणजे जीवन ही भावना त्यामागे असायची. आणि पैशाचे महत्त्व जाणवू देणंयाचाही त्यामागे हेतू असायचा. आजकाल मात्र तसे कोणी म्हणताना दिसत नाही. आजकाल पैशालाच किंमत राहिलेली नाही. पूर्वीच्या काळी लक्षाधीश म्हणजे फार मोठा समजला जायचा. लाखात एक असे म्हणत त्यामध्येही लाख या संख्येचे महत्त्व स्पष्ट होत असे. आता लाख कोटी या संख्यांना काही किंत राहिलेली नाही. पूर्वी आयुष्यभर कष्ट केल्यानंतर कोठेतरी लाख रुपये पाहायला मिळत वा जमवता येत असत. आजकाल तर तरुण पिढीचा पगारच महिन्याला लाखात असतो. आणि खेळाडू, सेलिब्रिटी यांचे मानधन अनेक कोटीत असते. यात क्रिकेटपटू हे आघाडीवर आहेत. आणि ते खर्चही तसा करतात, हल्लीच कोठे तरी वाचले होते, भारतीय संघांचा कर्णधार आणि जगातील एक अग्रगण्य फलंदाज विराट कोहली जे पाणी पितो, त्याची किंमत 500 रुपये लिटर इतकी असते. सर्वसामान्य माणूस अगदी दहावीस रुपयांचे पाण्याची बाटली विकत घेतानाही विचार करतो.
विराट कोहलीच्या पिण्याच्या पाण्याची सहज नेटवर माहिती पाहिली, तर आढळून आले की, हे 500 रुपये लिटरचे पाणी म्हणे परदेशातून येत असते. एव्हियन ब्रॅंडचे हे पाणी फ्रान्समधून आयात केले जाते. त्याच्या अनेक व्हरायटी आहेत आणि भारतात एव्हियनची सर्वात स्वस्त पाण्याची बाटली 240 रुपयांना मिळते. तिच्यात अर्धा लिटर पाणी असते. त्यात पुढे अशीही माहिती मिळाली, की काही सेलिब्रिटीज एका लिटर पाण्यासाठी 36 हजार रुपयापर्यंत रक्कम मोजतात. ते वाचल्यानंतर माझ्या तर तोंडचे पाणीच पळाले. या महागड्या पाण्यात अनेक खास गुण असल्याचे सांगितले जाते. असतीलही. अशा खर्चांना मात्र नुसता पाण्यासारखा पैसा खर्च करणे म्हणणे योग्य नाही. पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण म्हणणे अधिक योग्य. आता माझ्या मनात एक प्रश्न असा उभा राहतो, की सेलिब्रिटी होण्यापूर्वी विराट कोहली वा अन्य सेलिब्रिटीजही कोणते पाणी पीत असतील?
योगिता जगदाळे