ढाका – बांगलादेशातील पहिले हिंदू सरन्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्यावर 40 दशलक्ष टका इतक्या रकमेच्या आफरातफरीच्या आरोपाखाली अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. न्यायालयातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अमेरिकेत राहणाऱ्या न्या. सिन्हा यांना भ्रष्टाचार विरोधी आयोगाकडून आरोपपत्रामध्ये फरार घोषित करण्यत आले आहे.
ढाक्यच्य वरिष्ठ विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाचे न्या. के.एम. एम्रुत कायेश यांनी न्या. सिन्हा यांच्यासह अन्य 10 जणांविरोधातील आफरातफरीच्या आरोपांची दखल घेतली आणि हे अटक वॉरंट जारी केले आहे. न्या. सिन्हा आणि अन्य 10 जणांनी मिळून 4 कोटी टका (471,993 डॉलर)ची 2016 मध्ये आफरातफर आणि मनी लॉन्डरिंग केले असल्याचा आरोप असल्याचे सरकारी वकिल तापोष कुमार पाल यांनी पत्रकारांना सांगितले. आरोपपत्रामधील अन्य आरोपी हे फार्मर्स बॅंकेचे माजी अधिकारी आहेत. यामध्ये बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालकांचाही समावेश आहे.
दोन उद्योगपतींनी बॅंकेकडून बनावट कागदपत्रांसह “फार्मर्स बॅंके’तून घेतलेल्या 40 दशलक्ष टका रकमेची कर्जाची रक्कम न्या. सिन्हा यांच्या खात्यात जमा झाली असल्याचा पुरावा आपल्याला मिळाला असल्याचे भ्रष्टाचार विरोधी आयोगाने म्हटले होते. त्यानंतर तीन महिन्यांनंतर हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.