वडगावशेरी, दि. 25 (प्रतिनिधी) -पुणे-नगर महामार्गावर असलेल्या रस्त्यावरील महत्वाच्या चौकातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या तिन्ही चौकात प्रत्येकी दोन ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली. गेल्या काही वर्षात या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले, त्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. यासाठी टाटा गार्डन, इनॉर्बिट, विमाननगर आणि वडगावशेरी फाटा या महत्वाच्या चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. परंतु, वाहन चालकांकडून वाहतूक नियमाचा भग केला जात असल्याबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते, याची दखल घेत या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत प्रशानाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सर्व महत्त्वाच्या चौकात दोन वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे.
सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक सुरळीत करण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. त्यासोबत वाहतूक पोलिसही आपले कर्तव्य “नेहमी प्रमाणे’ पार पाडणार आहेत. ट्रॅफिक वॉर्डन नेमल्याने पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.