वाल्हे : वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुकदमवाडीत कुर्ला (मुंबई) येथून आलेल्या एकाचा करोना अहवाल मंगळवारी (दि. 7) पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण गाव चिंताग्रस्त झाले होते. त्याला कोविड केअर सेंटरला हलविल्यानंतर गावात करोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या. अखेर संबंधित व्यक्ती करोनावर मात करून आपल्या घरी परतल्याने गाव करोनामुक्त झाले आहे.
सरपंच अमोल खवले व ग्रामविकास अधिकारी बबन चखाले म्हणाले, की गावातील एकमेव करोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण बरा झाल्याने गावाच्यादृष्टीने ही आनंदाची बाब आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. गावात बाहेरून आलेल्या जवळपास 65 व्यक्तींची तपासणी करून त्यांना होमक्वारंटाइन केलेले आहे. ते देखील स्वत: काळजी घेत आहेत.
‘गावात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून करोना योद्धे आघाडीवर लढत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी निष्काळजीपणे न वागता सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटाझर वापरणे, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा-जत्रा, लग्न, पूजा, वाढदिवस आदी गर्दीचे कार्यक्रम टाळणे अपेक्षित असून ही काळजी घ्यावी अन्यथा येणाऱ्या करोना आपत्तीतून आपणास कोणीही वाचवू शकणार नाही.’
– प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष, जिल्हा बॅंक, पुणे