कोरेगाव भीमा- फुलगाव (ता. हवेली) येथे करोनाबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. फुलगाव ग्रामपंचायतीकडून आठवड्यातून एकदा संपूर्ण गाव सोडियम हायफोक्लोराईड फवारणी करण्यात येत आहे. बाहेर गावातून किंवा मुंबई येथून आलेल्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येत आहे. यासाठी सर्व ग्रामस्थही एकमताने आरोग्याची काळजी घेत आहेत. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व सर्व कर्मचारी हे गावाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत.
अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन प्रत्येकाची आरोग्य तपासणी करत करोनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
गावातील सर्व नागरिक नियमांचे पालन करत असून आरोग्यविषयक काळजी घेण्यात येत आहे. गाव करोनामुक्त ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. संपूर्ण गावातील नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत डेटॉल साबण व सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच मंदाकिनी साकोरे यांनी दिली.