मुंबई – पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन देशव्यापी झालं आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. सर्व चर्चा निष्फळ होत आहेत. कृषी कायद्यात कुठल्याही परिस्थितीत बदल करायाचा नाही किवां हा कायदा मागे घ्यायचा नाही अशी ताठर भूमिका केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतली असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने भारत बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन अशोक चव्हाणांनी केले आहे.
भारतीय जनता पक्ष सोडून सर्व राजकीय पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि कायदे कसे शेतकरी विरोधी व नुकसानकारक आहेत ,हे केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावे, ही भूमिका या बंदमागे आहे असंही अशोक चव्हाण म्हणाले. यासंदर्भात त्यांनी सोशल माध्यमाव्दारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असून, हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, त्यांना जागे करण्यासाठी ८ डिसेंबरचा ‘भारत बंद’ महत्वाचा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात केंद्रावरील दबाव वाढवावा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
केंद्र सरकारने संसदेत कृषी विधेयक मांडण्यापासून ते मंजूर करेपर्यंत काँग्रेस पक्षाने विरोधाची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सातत्यानं कृषी कायद्यांना विरोध केला आहे. पंजाबमध्ये तसेच देशातील विविध ठिकाणी ट्रॅक्टर रॅलीद्वारे केंद्राच्या कायद्यांचा विरोध करण्यात आला आहे. यापैकी अनेक ट्रॅक्टर रॅलीत राहुल गांधीनी देखील सहभाग घेतला आहे , असंही यावेळी अशोक चव्हाण यांनी सांगितलं.