मुंबई – डीएचएफएल आणि येस बॅंक गैरव्यवहारातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांच्या कोठडीत 10 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या दोघांची कोठडी संपत असल्याने त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
या दोघांसह तपासयंत्रणेने महाबळेश्वरमधील बंगल्याची झडती घेतली आहे. याप्रकरणी येस बॅंकेचे सर्वेसर्वा राणा कपूर यांच्यासोबत वाधवान यांचे संबंध आणि येस बॅंक घोटाळ्यामागचे षडयंत्र याचा खोलवर तपास होणे गरजेच आहे. त्यामुळे कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंची कोठडी सीबीआयने वाढवून मागितली. वाधवान यांच्या वतीने सीबीआयच्या या मागणीचा विरोध करण्यात आला. मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने वाधवान बंधूंची सीबीआय कोठडी आणखीन दोन दिवसांनी वाढवून दिली.
जामीनावर असतानाही करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही विशेष परवानगी काढत महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास केल्यामुळे वाधवान बंधू काही दिवसांपूर्वी वादात अडकले होते.
कुख्यात गॅंगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीने जानेवारीत कपिल वाधवानला अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग ऍक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच येस बॅंकेच्या 37 हजार कोटींच्या कर्ज मंजुरीच्या बदल्यात त्याने बॅंकेचा प्रमुख राणा कपूर व त्यांच्या कुटुंबीयाच्या परदेशातील बॅंक खात्यावर 600 कोटींची लाच दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांच्याविरोधात सीबीआयने 7 मार्च रोजी स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे.