नवी दिल्ली – डीएचएफएल कंपनीचे प्रवर्तक असणाऱ्या कपिल आणि धीरज वाधवान या बंधूंची ब्रिटनमधील 578 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती महत्वपूर्ण कारवाई केली.
येस बॅंक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी आधीच अटक करण्यात आलेले वाधवान बंधू सध्या तुरूंगात आहेत. आता नव्या प्रकरणात ईडीने त्यांच्या मालकीच्या ब्रिटनस्थित कंपनीच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ते प्रकरण उत्तरप्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लि.(यूपीपीसीएल) कंपनीशी निगडीत आहे.
लखनौ पोलिसांनी यूपीपीसीएलच्या काही अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने चौकशी हाती घेतली आहे. यूपीपीसीएल कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची कोट्यवधींची रक्कम नियमांचा भंग करून डीएचएफएलमध्ये अवैधपणे गुंतवण्यात आल्याचा आरोप आहे.
डीएचएफएलकडून मोठ्या कर्जांचे वितरण झाले. त्यातील बहुतांश कर्ज बुडीत ठरले. त्यामुळे वाधवान बंधू आधीपासूनच ईडीच्या रडारवर आहेत. त्यांची 1 हजार 412 कोटी रूपये मुल्याची मालमत्ता ईडीने याआधीच जप्त केली आहे.