काबूल – अफगाणिस्तानात तालिबान हळू-हळू आपली पाळेमुळे मजबूत करत आहे आणि आपले कायदे लागू करत आहे. आता सलून चालक तालिबानच्या निशाण्यावर आले आहेत. कारण, त्यांनी सलून चालकांना आदेश आणि धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.
अफगाणिस्तानातील अनेक ब्युटी पालर्सच्या बाहेरचे मुलींचे फोटो तालिबान्यांनी फाडले आहे, हे ब्युटी पार्लरही बंद झाले आहेत. त्यानंतर त्यांनी आता सलून चालकांना आपल्या निशाण्यावर घेतले आहे. हेलमंद प्रांतातील सलूनवर तालिबान्यांनी क्लिन शेव करण्यावर किंवा दाढी ट्रीम करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. याबाबत तालिबानी प्रत्येक सलून चालकाला जाऊन धमकावतही आहेत.
एका विदेशी माध्यमाने याबाबत बातमी दिली आहे. रिपोर्टनुसार, तालिबान्यांनी सलून चालकांना दाढी ट्रीम करण्यावर वा दाढी कापण्यावर बंदी घातली आहे. दाढी करणे हे इस्लामी कायद्याविरोधात असल्याचे तालिबान्यांचे म्हणणे आहे.
शिवाय, या आदेशाचे जे सलूनचालक पालन करणार नाही, त्यांना त्यांची कडक शिक्षा भोगावी लागेल अशीही धमकी देण्यात आली आहे. याबाबत इस्लामिक ओरिएंटेशन मंत्रालयाने सलून चालकांची एक बैठकही घेतल्याची माहिती आहे.